हा आहे ‘इम्पॉसिबल बर्गर’


अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर असलेल्या पीटर ब्राऊन यांनी २०११ साली ‘इम्पॉसिबल फूड्स नामक कंपनी सुरु केली. याच कंपनीच्या अंतर्गत त्यांनी ‘इम्पॉसिबल बर्गर’ नामक संपूर्ण शाकाहारी बर्गर बाजारामध्ये आणला आहे. वास्तविक बर्गर या अस्सल अमेरिकन पदार्थामध्ये मांसाहारी, मुख्यत्वे बीफपासून बनविल्या गेलेल्या कटलेटचा आणि इतर भाज्यांचा वापर केला जातो. मात्र इम्पॉसिबल बर्गर हा संपूर्ण शाकाहारी पर्याय असून, त्याला चव आणि त्याचे रूप मात्र बीफपासून तयार केलेल्या कटलेटप्रमाणे आहे. ज्या लोकांनी मांसाहाराचा त्याग करून संपूर्ण शाकाहार किंवा व्हेगन आहारपद्धती स्वीकारली आहे, त्यांच्यासाठी हा बर्गर उत्तम पर्याय आहे.

काही खवय्यांच्या मते हा बर्गर जास्त पौष्टिक असून पर्यावरणाची सुरक्षा जपणारा आहे, तर काहींच्या मते हा बर्गर बनविताना वापरले गेलेले सर्वच पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसून, केवळ संपूर्ण शाकाहारी आहे, म्हणून या बर्गरचे सेवन करणे योग्य नाही. हा बर्गर बनविण्यासाठी वनस्पतींपासून उपलब्ध झालेले पदार्थ वापरण्यात येत असून, यामध्ये पाणी, व्हीट प्रोटीन, नारळाचे तेल, बटाट्यांपासून मिळविलेले प्रोटीन्स, जीवनसत्वे, इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. अलीकडच्या काळामध्ये हा बर्गर अधिक आरोग्यदायी बनविण्याच्या दृष्टीने यामधून गव्हापासून मिळविण्यात आलेल्या प्रथिनांच्या ऐवजी सोयाबीन प्रोटीन्सचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘लेगहेमोग्लोबीन’ या पदार्थामुळे या बर्गरला बीफप्रमाणे चव मिळते.

मात्र बीफ पासून तयार होणाऱ्या बर्गरमध्ये लेगहेमोग्लोबीन कृत्रिम स्वरूपात असते, पण इम्पॉसिबल बर्गर तयार करताना मात्र हा पदार्थ, या बर्गरला बीफप्रमाणे स्वाद देण्यासाठी कृत्रिम रित्या तयार करून या मध्ये घालण्यात येतो. म्हणूनच हा बर्गर आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, याबद्दल तज्ञांमध्ये दुमत आहे. सध्या हा इम्पॉसिबल बर्गर अमेरिका, हॉंगकॉंग, आणि मकाऊ या ठिकाणच्या काही ठराविक रेस्टॉरंट्स मध्येच उपलब्ध असून, पुढील काही महिन्यांमध्ये अमेरिकेतील सर्व सुपरमार्केट्समध्ये हे बर्गर उपलब्ध करविण्याचा कंपनीचा मानस आहे.

Leave a Comment