मित्र आणि शत्रूशी वर्तन असे असावे, सांगते चाणक्यनीती


आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्यांच्याबद्दल जिव्हाळा, आपुलकी वाटते असे आपले मित्र असतात, आणि ज्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये सतत संशयाची भावना असते, ज्यांच्याबद्दल आपले मत कलुषित असते, असे शत्रूही असतात. शत्रू आणि मित्र हे दोन्हीही मनुष्याच्या जीवनाला प्रभावित करणारे आहेत. योग्य व्यक्तीची मित्रता मनुष्याच्या उन्नतीला, प्रगतीला निमित्त होत असून, शत्रूचा उद्देश केवळ आपल्याला नुकसान पोहोचविण्याचा असतो. नीतिशास्त्राचे गुरु मानले जाणारे चाणक्य यांनीही शत्रू आणि मित्र कसे ओळखावेत, आणि त्यांच्याशी आपले वर्तन कसे असावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे.

समोरची व्यक्ती आपली मित्र आहे किंवा शत्रू हे ओळखल्यानंतर त्या व्यक्तीशी आपले वर्तन कसे असावे, याबद्दल चाणक्यांनी मार्गदर्शन केले आहे. चाणक्यांनी म्हटले आहे, की आयुष्यामध्ये सफलता मिळविण्यासाठी मित्रांची आवश्यकता असते, पण आयुष्यामध्ये वारेमाप सफलता मिळविण्यासाठी शत्रूंची देखील आवश्यकता असते. किंबहुना आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी शत्रूला अयोग्य सिद्ध करणे हे मनुष्याला शक्य झाले, तर आयुष्यामध्ये तो यशस्वी होत असल्याचे चाणक्य म्हणतात.

शत्रूवर विजय मिळवायचा असेल, तर त्याची दुर्बलता हेरणे आवश्यक असल्याचे चाणक्य म्हणतात. शत्रूचे बल कशात आहे यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा शत्रूचा पाडाव करण्यासाठी शत्रू कुठे कमकुवत आहे हे पाहणे जास्त आवश्यक असल्याचे चाणक्य म्हणतात. त्याचबरोबर एखाद्या दुष्ट, इतरांचे अहित चिंतणाऱ्या, इतरांच्या विश्वासाला पात्र नसलेल्या व्यक्तीशी मैत्री करण्यापेक्षा शत्रूला मित्रत्वाच्या भावनेने पहावे असे ही चाणक्य सांगतात. चाणक्य यांच्यानुसार दुराचारी, कुदृष्टी ठेवणारा आणि दुराचारी लोकांच्या संगतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीशी मैत्री करणे हे विनाशाचे कारण बनू शकते.

शत्रू आणि मित्र हे सांगताना कोण हे ओळखणे अतिशय आवश्यक असल्याचे सांगून चाणक्य म्हणतात, की चंदनाचा वृक्ष सर्वत्र सुंगध आणि शीतलता या गुणांसाठी ओळखला जात असला, तरी याच चंदनाच्या वृक्षावर विषारी सर्प वास्तव्य करून असतात. म्हणजेच समोरची व्यक्ती कितीही गोड बोलणारी, आकर्षक व्यक्तिमत्वाची असली, तरी त्या व्यक्तीची विचारसरणी सकारात्मक असून ती व्यक्ती विश्वासार्ह असेलच असे नाही. किंबहुना समोरून मैत्रीपूर्ण भासणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्यासाठी शत्रुत्वाची भावनाही असू शकते, असेही चाणक्य यांनी म्हटले आहे.

Leave a Comment