कृषीपूरक व्यवसायातूनच शेतकऱ्यांची प्रगती शक्य – सुनील केदार


नागपूर : प्रयोगशील शेतकऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत परंपरागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवीन पीकपद्धती अनुसरावी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि जोडधंद्याला प्राधान्य देत कृषी मालावर प्रक्रिया करावी. कृषीपूरक व्यवसायातूनच शेतक-यांची प्रगती होणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या कै. आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित प्रयोगशील अशा 65 शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, इतर पदाधिकारी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे प्रामुख्याने उपस्थित होते.

कोरोना काळात सर्व घटक लॉकडाऊन होते. मात्र शेतकरी राबत होता. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे सर्व जग थांबले होते. मात्र शेतकरी थांबला नव्हता, असे सांगून केदार म्हणाले की, शेतकऱ्यांना शैक्षणिक अनुभव नसला तरी शेतकरी त्यांच्या कष्टातून अनुभव घेत शिकतात. त्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे.

नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कृषीविषयक विशेष उपक्रम राबविताना कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पंचायत समितीचे पदाधिकारी व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनांची माहिती घेताना त्याचा फायदा होईल. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी वारंवार बैठका घेत प्रयोगशील शेतकऱ्यांकडून परंपरागत शेती करणाऱ्या शेतक-यांना मार्गदर्शन केले पाहिजे. या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असे आवाहन केदार यांनी केले.

पीक विमा योजनेत राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी दिला असून, त्यासाठी तालुका स्तरावरील पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी पदाधिकारी व अधिकारी यांनी लक्ष घातले पाहिजे. पारंपरिक पीक पद्धतीने शेती करण्यापेक्षा इतर नगदी पिकांकडे शेतकऱ्यांना वळवा. रामटेक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पानमळे होते. ते कमी झाले‌ आहेत. आता नागपुरात लागणारे खायचे पान पश्चिम बंगालमधून येते, हे चित्र बदलले पाहिजे, असे आवाहन करुन केदार म्हणाले की, कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 300 ट्रक भाजीपाला येतो. त्यातील जवळपास 200 ट्रक हे परराज्यातून येतात. यात नागपूर जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा भाजीपाला का येत नाही, याचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

खुबाळा येथील शेतकरी उत्तम शेती करतात. तिथे दाळमिलसह विविध कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग सुरु असून, त्यातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्वात जास्त रोजगार मिळवून देणारा कृषी विभाग असून, त्याला संलग्नित बकरी पालन व कुक्कुटपालनाचे नवे जोडधंदे सुरु करण्याचे शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केले. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी बकरी व कुक्कुटपालनाकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे सांगून प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशकथा सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. त्यातून इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. या यशकथांच्या माध्यमातून नागपूर जिल्हा परिषदेने चांगला उपक्रम सुरु करावा, असे आवाहनही केदार यांनी यावेळी उपस्थितांना केले. यावेळी कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांचेही समयोचित भाषण झाले.