सकारात्मक ऊर्जेसाठी घरामध्ये असलेल्या ‘लकी बांबू’ची अशी घ्या काळजी


‘लकी बांबू’ हे वास्तविक बांबूचे झाड नसून, एक प्रकारची वॉटर लिलीची प्रजाती आहे, हे तथ्य अनेकांच्या परिचयाचे नाही. याच झाडाला चायनीज वॉटर बांबू, रिबन प्लांट, कर्ली बांबू, बेल्जियन एव्हरग्रीन इत्यादी नावांनीही ओळखले जाते. ही वनस्पती मूळची मध्य आफ्रिकेतील असून, फेंग शुईमध्ये या वनस्पतीला शुभ फलदायी आणि सकारात्मक उर्जेचे कारक मानण्यात आले आहे. म्हणूनच घरांमध्ये आणि ऑफिसेसमध्ये हे झाड सुंदरशा काचेच्या भांड्यामध्ये ठेवलेले आढळते. नवीन घराच्या गृह प्रवेशाच्या निमित्ताने किंवा वास्तूशांतीच्या निमित्ताने हे रोप आवर्जून भेट देण्याची पद्धतही रूढ आहे. लकी बांबूचे झाड केवळ पाण्यामध्ये ही वाढणारे असल्याने याला भांड्यामध्ये माती किंवा इतर कोणतेही ‘पॉटिंग मिडीयम’ घालण्याची आवश्यकता नाही. हे झाड लावण्यासाठी उथळ भांड्याची निवड न करता खोलगट भांड्याची निवड करावी. या झाडासाठी काचेच्या किंवा सिरॅमिकच्या भांड्यांचा वापर करावा. या भांड्याच्या तळाशी काही दगड घालून मग पाणी भरून ठेऊन हे झाड त्यामध्ये लावावे. या भांड्यामध्ये भरलेले पाणी स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.

लकी बांबूचे रोप फार ऊन लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. तीव्र उन्हाने या झाडाची पाने जळून जात असल्याने या झाडाला थेट सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ठेऊ नये. हे रोप मातीमध्ये लावण्यासाठी सर्वसाधारणपणे नवी रोपे लावण्यासाठी जी माती वापरली जाते, त्या मातीचा वापर करावा. रोप लावल्यानंतर ही माती ओलसर राहील इतपतच पाणी त्याला घालावे. जर पाणी जास्त झाले, तर या झाडाची मुळे सडण्याची शक्यता असते. या झाडांना वारंवार खात घालण्याची आवश्यकता नसते. हे झाड बारा ते तेहतीस अंश तापमानामध्ये व्यवस्थित वाढते. हे रोप जर एखाद्या वातानुकुलीत खोलीमध्ये ठेवले गेले असले, तर एअर कंडीशनर मधील थंड हवा थेट या झाडावर लागणार नाही अशा बेताने ठेवले जावे.

या झाडाची फारशी निगा राखण्याची आवश्यकता नसते. हे झाड काचेच्या भांड्यामध्ये लावले गेल्यास या भांड्याच्या तळाशी लहान दगड ठेवावेत, जेणेकरून या झाडाला आधार मिळू शकेल. हे झाड लावलेल्या भांड्यामध्ये कमीत कमी तीन इंच पाणी असेल याची दक्षता घ्यावी. या झाडाची मुळे नेहमी पाण्यामध्ये बुडलेली असावीत. हे झाड लावेलेल्या भांड्यामध्ये पाणी भरताना नळाचे साधे पाणी वापरणे टाळावे. या पाण्यामध्ये क्लोरिनचा अंश असल्याने त्याचे नुकसान या झाडाला होऊ शकते. त्यामुळे या झाडासाठी नेहमी फिल्टरचे, ‘आरओ’चे पाणी किंवा डिस्टिल्ड वॉटर वापरावे. यांपैकी काहीच उपलब्ध नसेल, तर नळाचे पाणी एका भांड्यामध्ये चोवीस तास भरून ठेवावे. त्यामुळे या पाण्यामध्ये असलेले क्लोरीन हवेमध्ये विरून जाईल आणि त्यानंतर हे पाणी लकी बांबूच्या रोपासाठी वापरण्यास योग्य होईल. दर आठवड्याने हे पाणी बदलले जावे. या रोपाला दर एका महिन्याने चिमुटभर खत पाण्यामध्ये मिसळून घातले जावे.

या झाडाची वाढ प्रकाशाच्या दिशेने होत असल्याने याला चहु बाजूंनी व्यवस्थित प्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी. तसेच या झाडाची वाढ व्यवस्थित होण्यासाठी याचे नियमित ‘ट्रीमिंग’ करणेही आवश्यक आहे. या झाडाची पिवळी पडलेली किंवा वाळून गेलेली पाने तत्परतेने काढली जावीत. या झाडावर सामान्यपणे कीड दिसून येत नाही, पण हे झाड मातीमध्ये लावले गेले तर मात्र यावर कीड पडण्याची शक्यता असते. अशा वेळी कीटकनाशकाचा वापर अनिवार्य ठरतो.

Leave a Comment