मुकेश अंबानींना आहेत हे खाद्यपदार्थ प्रिय


भारतातील सर्वात धनाढ्य आणि नामवंत व्यावसायिक आणि रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन म्हणून मुकेश अंबानींची ओळख सर्वांनाच आहे. इतक्या धनाढ्य व्यक्तीचे राहणीमान अतिशय उंची असेल, जगभरातील अनेक चविष्ट व्यंजने त्यांच्या भोजनामध्ये नित्यनेमाने समाविष्ट होत असतील, अशी आपल्यापैकी अनेकांची कल्पना असेल. मात्र वास्तविक मुकेश अंबानी यांचे राहणीमान साधे असून, जगभरातील अनेक चविष्ट पदार्थांच्या ऐवजी मुकेश अंबानी यांना घरचे साधे भारतीय भोजन विशेष प्रिय आहे. मुकेश अंबानी संपूर्ण शाकाहारी असून, सर्वसामन्यांप्रमाणे रोजच्या भोजनामध्ये पोळी, भाजी, वरण, भात हे पदार्थ घेणे त्यांना आवडते.

मुकेशजींच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा रस, आणि सुका मेवा यांचा समावेश असतो. कामाची धांदल नसेल तेव्हा, सुट्टीच्या दिवशी इडली, डोसा सारखे दाक्षिणात्य पदार्थ मुकेशजींना सकाळच्या नाश्त्यामध्ये विशेष आवडतात. मुकेश अंबानी यांना निरनिराळे पदार्थ चाखून पाहण्यास आवडते. किंबहुना लहर आली, की रस्त्याच्या कडेला एखाद्या ढाब्यावरील किंवा हातगाडीवरील चविष्ट पदार्थ चाखून पाहण्याची संधीही अनेकदा मुकेश अंबानी घेत असतात.

मुकेश अंबानी यांना जिलेबी अतिशय प्रिय असून, कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर ताज्या जिलेब्या कुठे दिसल्या, तर त्या खाण्याचा मोह त्यांना आवरत नाही. अंबानी यांना ताज कोलाबा येथे मिळणारी चाट अतिशय प्रिय असल्याने अनेकदा मुकेशजी येथे चाटचा आस्वाद घेताना पहावयास मिळतात. त्याचबरोबर मुकेश अंबानी यांना मैसूर कॅफेमध्ये मिळणारे पदार्थही अतिशय प्रिय आहेत. या ठिकाणीही मुकेश अंबानी यांना आपल्या आवडत्या भोजनाचा आस्वाद घेताना अनेकदा पाहिले गेले आहे.

Leave a Comment