शांत झोपेसाठी आहार


उत्तम आणि शांत झोप ही चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. ही गोष्ट काही सांगण्याची गरज नाही. ती सर्वांना माहीत आहे. परंतु चांगली झोप लागणे हे मानसिक आरोग्यावर अवलंबून असल्याचे मानले जाते. ते पूर्ण खरे नाही. काही वेळा आपण काय खातो यावरसुध्दा आपली झोप कशी असणार आहे हे अवलंबून असते. त्यामुळे शांत आणि चांगल्या झोपेचा विचार हा आहाराशीसुध्दा जोडलेला आहे. झोपण्यापूर्वी कर्बोदके, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमयुक्त आहार घेतला असेल तर झोप चांगली लागते. तेव्हा आपण संध्याकाळच्या जेवणात कोणते पदार्थ समाविष्ट करत आहोत याचा अभ्यास आणि विचार केला गेला पाहिजे. केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर असते. त्यातील पोटॅशियम हे अन्य उपयोगाचे असेल तरी मग्नेशियम मात्र शांत झोप लागण्यास मदत करते.

म्हणून झोपण्यापूर्वी एखादी केळी खावी. त्याचा उपयोग झोपेलाही होतो, पचनालाही होतो आणि रक्ताभिसरणालाही होतो. ट्रिप्टोफॅन नावाचे द्रव्य मेंदूला संचालित करते. कारण त्यातून मेलॅटोनीन आणि सेरोटोनीन ही दोन द्रव्ये निर्माण होत असतात. जी आपल्या झोपेतल्या विविध अवस्थांचे संतुलन राखण्यास मदत करतात. या सगळ्या प्रक्रिया करणारे ट्रिप्टोफॅन हे द्रव्य मधामध्ये असते. म्हणून झोपण्यापूर्वी एक चमचाभर मध घेतला पाहिजे. विविध प्रकारची द्विदल धान्ये हीसुध्दा ट्रिप्टोफॅनयुक्त असतात. म्हणून त्यांचेही सेवन रात्रीच्या जेवणात अवश्य करावे.

झोपेसाठी आवश्यक असलेले मॅग्नेशियम द्रव्य बदामांमध्ये विपुलतेने असते. जर्नल ऑफ ऑर्थोमॉलीक्युलर मेडिसीन या मासिकामध्ये हे संशोधन विस्ताराने मांडण्यात आलेले आहे. शरीरातील मॅग्नेशियम कमी होते तेव्हा माणसाची झोप उडते. अनेक लोकांना रात्री झोप लागत नाही आणि ते मध्यरात्रीनंतरसुध्दा डोळे टक्क उघडे ठेवून तळमळत बेडवर पडलेले असतात. अशा लोकांना बदाम उपयुक्त ठरेल. कारण बदामात मॅग्नेशियम असते. बदामाने डोकदुखीसुध्दा कमी होते. डी व्हिटॅमीन भरपूर असणार्‍या अंड्यांच्या सेवनामुळेसुध्दा झोप येते. कारण डी व्हिटॅमीन कमी असल्यास चांगली झोप लागत नसते. काही लोकांना रात्री झोपताना दूध पिण्याची सवय असते. त्यामुळेसुध्दा चांगली झोप लागते. कारण दुधामध्ये कॅल्शियम भरपूर असते. चामोमाईल टी हा चहाचा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये ग्लायसिन आणि स्नायूंचे आरोग्य राखणारी द्रव्ये असतात. त्या चहामुळेसुध्दा झोप चांगली लागते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment