कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल राहू नये – अजित पवार


पुणे : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतू कोरोनाचा धोका अजूनही गेलेला नाही त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी गाफिल राहू नये व जास्तीत जास्त दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. वाढती गर्दी लक्षात घेता शनिवार, रविवारचे निर्बंध कडक करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सील हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, जिल्ह्यातील शहरी भागात निर्बंध शिथिल केल्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. पुढील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्ण दर कमी होतांना दिसत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य तयारी केली असली तरी नागरिकांनी आवश्यक त्या नियमांचे पालन केलेच पाहिजे.

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कमीत कमी एक तरी ऑसिजन प्लांट लवकरात लवकर कार्यान्वित करावा. सध्या जिल्ह्यात 15 ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित असून 39 ऑक्सिजन जनरेशन प्लांट चे काम प्रगतीपथावर आहे. ग्रामीण भागात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी तयारी केली आहे. अवसरी येथील शिवनेरी जम्बो कोविड रुग्णालय नुकतेच कार्यान्वित केले आहे. ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे लहान मुलांन करीता स्वतंत्र कक्ष कार्यान्वित. संभाव्य कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ग्रामीण भागात सीएचओ, आशा वर्कर्स, एएनएम, अंगणवाडी सेविका, आरोग्य सहायक यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षित बालरोग तज्ञ नियुक्त करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष देण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच म्युकरमायकोसिस बाबत शासनाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

पोलीस प्रशासनाने वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचेही पवार यांनी सांगून तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आयएलआय आणि सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण, सुपर स्प्रेडर्स वर अधिक लक्ष, हॉटस्पॉट मध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट वाढवणे, दुसऱ्या लाटेमध्ये वाढवलेल इन्फ्रास्ट्रक्चर तसेच ठेवणे, सर्व डीसीएच मध्ये 10 टक्के बेड्स लहान मुलांसाठी राखीव ठेवणे, सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे. तसेच तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने लोक शिक्षण व जनजागृती करण्यात येत आहे. केंद्र सरकार कडून लस पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर जिल्ह्यात रोज दिड लाख नागरिकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन झाल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी डॉ.सुभाष साळुंके यांनी सांगितले राज्यातील तिसऱ्या लाटेची तीव्रता लसीकरणावर अवलंबून असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेतील एकूण रुग्णांपैकी साधारण 25 टक्के रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा अंदाज आहे. साधारण 50 टक्के रुग्णांना रुग्णालयीन सेवेची आवश्यकता भासू शकेल.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव, तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या दृष्टीने तयारी, लहान मुलांना तिसऱ्या लाटेतील धोका, लसीकरण आणि निर्बंध शिथिल केल्यानंतरची परिस्थिती याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

तसेच पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या चार रुग्णालयातील मृत्यूचे वयानुसार, व्याधीनुसार विश्लेषण केले त्यात त्यांनी 1727 पैकी 1482 रुग्णांच्या मृत्यूचा तपशील दिला. यातील 53 टक्के मृत्यू हे 60 वर्षाच्या खालील नागरिकांचे असून त्यातील 43 टक्के नागरिकांना कोणतीही व्याधी नव्हती असे आढळून आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रियाताई सुळे, वंदना चव्हाण, श्रीरंग बारणे, गिरिष बापट, आमदार ॲड. अशोक पवार, संजय जगताप, सुनिल टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, दिलीप मोहिते, यांनीही महत्त्वाचे विषय मांडले.