कॉफीमध्ये खोबरेल तेल घालून त्याचे सेवन करणे कितपत फायदेशीर?


आपल्या दिवसाची सुरुवात अनेकजण गरमागरम कॉफीने करणे पसंत करतात. कॉफी हे कॅफीनचे उत्तम स्रोत असून, शरीरामध्ये उत्साह निर्माण करणारे आणि मेंदू सक्रीय करणारे असे हे पेय आहे. अलीकडच्या काळामध्ये फिटनेस प्रेमी लोकांनी कॉफीमधून दुध वजा केले असून, त्यामध्ये खोबरेल तेल घालण्याची प्रथा सुरु केली आहे. यालाच ‘बुलेट प्रुफ’ कॉफी असेही म्हटले जाते. मात्र ही कॉफी आपल्या आहारामध्ये समाविष्ट करताना ही आरोग्याच्या दृष्टीने कितपत उपयुक्त आहे हे जाणून घेणे अगत्याचे ठरते.

अलीकडच्या काळामध्ये खोबरेल तेलाचे आहारातील महत्व जगमान्य होऊ लागले असून, सध्या लोकप्रिय असलेल्या ‘कीटोजेनिक डायट’मध्ये या तेलाचा समावेश करण्याचा सल्ला आवर्जून दिला जात असतो. या आहारपद्धतीमध्ये कर्बोदके वर्ज्य करायची असून, यामध्ये स्निग्ध पदार्थांचा समावेश करायचा असतो. त्या दृष्टीने खोबरेल तेलाचा वापर या आहारपद्धतीमध्ये महत्वाचा ठरतो. या तेलाचा समावेश आहारामध्ये केला गेल्याने शरीरातील चरबीचा वापर शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी केला जातो आणि त्यामुळे वजन झपाट्याने घटू लागते. त्यामुळे कॉफीमध्ये दुध आणि साखर न घालता एक चमचा खोबरेल तेल घातलेली ‘बुलेट प्रुफ’ कॉफी या आहाराचा महत्वाचा भाग आहे.

वजन घटविण्याखेरीज कॉफीमध्ये खोबरेल तेल घालून त्याचे सेवन करण्याचे आणखीही फायदे आहेत. याच्या सेवनाने शरीराची चयापचय शक्ती सुधारते, आणि शरीर नेहमीपेक्षा अधिक कॅलरी, ऊर्जेमधे परिवर्तीत करू लागते. कॉफीमध्ये असलेले कॅफिन आणि खोबरेल तेलामध्ये असलेले ‘मिडीयम चेन ट्रायग्लिसराईड्स’ (MCT) यांचे मिश्रण शरीराला आवश्यक असेलेली ऊर्जा त्वरित प्रदान करतात. याच्या सेवनाने अन्नपचन व्यवस्थित होऊन बद्धकोष्ठ दूर होण्यास मदत होत असून याच्या सेवनाने शरीरातील चांगल्या कोलेस्टेरोलचे प्रमाण वाढते. ज्याप्रमाणे कॉफीमध्ये खोबरेल तेल घालून त्याचे सेवन करण्याचे काही फायदे आहेत, त्याचप्रमाणे याचे काही तोटेही आहेत.

कीटोजेनिक डायटपद्धतीमध्ये वजन घटविण्याच्या उद्देशाने जे लोक बुलेट प्रुफ कॉफीचे सेवन करीत असतील, त्यांनी सकाळच्या नाश्त्याच्या ऐवजी या कॉफीचे सेवन करायचे असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामधून आपल्या शरीराला मिळणारे पोषक घटक केवळ या कॉफीच्या सेवनातून आपल्याला मिळू शकत नाहीत. खोबरेल तेलामध्ये जरी पोषक घटक असले, तरी सकाळच्या नाश्त्यामध्ये ज्याप्रकारे वैविध्य आणता येते तसे वैविध्य या कॉफीच्या बाबतीत पहावयास मिळत नाही. खोबरेल तेलामध्ये कॅलरीज जास्त असून, एक मोठा चमचा तेलामध्ये साधारण १२१ कॅलरीज असतात. त्यामुळे या अतिरिक्त कॅलरीज खर्च झाल्या नाहीत, तर वजन वाढू लागण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे ज्यांना गॉल ब्लॅडरशी निगडीत समस्या असतील, त्यांच्यासाठी या कॉफीचे सेवन अपायकारक ठरू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment