झायडस कॅडिला आपल्या कोरोना लसीच्या आपात्कालीन वापरासाठी करणार अर्ज


नवी दिल्ली : भारतातील अग्रगण्य औषध कंपनी असलेल्या झायडस कॅडिला कंपनीकडून त्यांच्या ZyCoV-D या लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळावी अशी विनंती करणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) येत्या आठवड्याभरात तशा प्रकारची विनंती करण्यात येणार असून या लसीला मान्यता मिळाल्यास ती जगातील पहिली DNA आधारित लस असणार आहे.

आतापर्यंत तीन लसींच्या आपात्कालीन वापराला भारतात परवानगी मिळाली आहे. झायडस कॅडिलाच्या ZyCoV-D लसीच्या वापराला परवानगी मिळाल्यास ती देशातील चौथी तर स्वदेशी प्रकारातील दुसरी लस असणार आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची आकडेवारी तयार आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी झायडस कॅडिला ने 28,000 स्वयंसेवकांचा वापर केला होता. त्याचा अहवाल आता ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे जमा करण्यात येणार आहे. 12 ते 18 वयोगटातील बालकांसाठीही ही लस उपयुक्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

झायडस कॅडिला ची ZyCoV-D ही लस डीएनए आधारित असल्याने त्यामध्ये एक जेनेटिक कोड आहे. त्या जेनेटिक कोडमुळे शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदाबाद स्थित या कंपनीच्या लसीच्या साठवणुकीसाठी दोन ते चार डिग्री सेल्सियस तापमानाची गरज असते. त्यामुळे त्याच्या साठवणुकीसाठी कोल्ड चेनची आवश्यकता नाही. त्यामुळे देशभरात त्याचे वितरण सुलभपणे होण्याची शक्यता आहे. देशात आतापर्यंत भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन, सीरमची कोव्हिशिल्ड आणि रशियन स्पुटनिक व्ही या लसींना परवानगी मिळाली आहे. यात आता ZyCoV-D ची भर पडण्याची शक्यता आहे.