भारतात करोनाची १२० पेक्षा जास्त म्युटेशन?

भारतात करोना ची आत्तापर्यंत १२० पेक्षा अधिक म्युटेशन झाली असल्याचे आणि त्यातील आठ गंभीर स्वरुपाची असल्याचे करोना सिक्वेन्सिंग मध्ये दिसून आले आहे. करोनाची दुसरी लाट नुकती ओसरू लागली असताना देशात करोनाची ३८ कोटी सँपल्स तपासण्यात आली आहेत. पैकी २८ हजार सँपल्सचे जीनोम सिक्वेन्सिंग होऊ शकले आहे. आणखी १४ म्युटेशनची चिकित्सा अजून सुरु असल्याचे समजते. सिक्वेन्सिंग प्रयोगाच्या प्रारंभिक रिपोर्टचा हा अहवाल धक्कादायक मानला जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची जी म्युटेशन गंभीर म्हणून जाहीर केली आहेत त्यातील आठ भारतात सापडली आहेत. बीटा, अल्फा, गामा, इटा, कापा, डेल्टा प्लस, लोटा ही गंभीर व्हेरीयंट भारतात मिळाली आहेत. या करोना व्हेरीयंटचा फैलाव फार वेगाने होतो असे दिसून आले आहे. कापा आणि डेल्टा प्लस ही डेल्टा व्हेरीयंटचेच प्रकार असून ही गंभीर मानली गेलेली म्युटेशन रुग्णाच्या अँटीबॉडीजवर हल्ला चढवितात.

ज्या १४ म्युटेशन बाबत संशोधन सुरु आहे, ती किती गंभीर आहेत याविषयी आत्ताच मत व्यक्त करणे अवघड असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र करोना फारच वेगाने रूप बदलत आहे हे नक्की झाले आहे. जीनोम सिक्वेन्सिंग साठी प्रत्येक राज्यातून ५ टक्के नमुने पाठवायचा नियम भारत सरकारने केला आहे मात्र जेमतेम ३ टक्के नमुनेच पाठविले जात आहेत असेही समजते.