फ्लाईंग सिख मिल्खासिंग यांचे निधन

करोना संक्रमण झाल्यापासून एक महिना करोनाशी झुंज दिल्यानंतर धावपटू मिल्खासिंग यांचे शुक्रवारी रात्री उशिरा पीजीआय चंदिगढ येथे निधन झाले. पूर्व ऑलिम्पियन आणि पद्मश्री मिल्खासिंग फ्लाईंग सिख या नावाने जगभर प्रसिद्ध होते. विशेष म्हणजे ही उपाधी त्यांना पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती जनरल अयुबखान यांनी १९६० मध्ये दिली होती. मिल्खासिंग यांच्या मागे तीन मुली आणि १ मुलगा असून त्यांचा मुलगा जीवा आंतरराष्ट्रीय गोल्फर आहे.

मिल्खा सिंग ९१ वर्षांचे होते. त्यांना १९ मे रोजी करोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल केले गेले होते. त्यांची प्रकृती स्थिर होती आणि कुटुंबियांच्या आग्रहाखातर त्यांना रुग्णालयातून ३० मे रोजी घरी सोडले गेले होते. ३ जून रोजी त्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता मात्र त्यांना फार अशक्तपणा आला होता. शुक्रवारी रात्री त्यांची तब्येत अधिक बिघडली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचेही १३ जून रोजी सायंकाळी करोना ने निधन झाले होते.

पंतप्रधान मोदी यांनी मिल्खासिंग यांच्या आजाराची बातमी मिळताच त्यांच्याशी फोन वरून संपर्क साधून लवकर बरे व्हा अश्या शुभेच्छा दिल्या होत्या. मिल्खासिंग यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशभरात आणि क्रीडाक्षेत्रात दुःखाची लहर पसरली आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी मिल्खासिंग याना श्रद्धांजली दिली आहे.

क्रीडामंत्री किरण रीजुजू यांनी एक व्हिडीओ शेअर करून मिल्खासिंग यांची शेवटची इच्छा पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे. अॅथलेटिक्स मध्ये भारताला कॉमन वेल्थ स्पर्धेत पाहिले गोल्ड मिळवून देणाऱ्या मिल्खासिंग यांची शेवटची इच्छा देशातील नौजवानांनी रोम ऑलिम्पिक मध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून द्यावे अशी होती. मिल्खासिंग यांनी उन्हाळी रोम ऑलिम्पिक १९६० आणि टोक्यो १९६४ स्पर्धात देशाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्या जीवनावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ नावाने निघालेल्या चित्रपटासाठी त्यांनी केवळ १ रु. मानधन घेतले होते.