बँक ऑफ अमेरिकेचा ‘तो’ दावा चुकीचा, 1.38 लाख जणांना 2021 मध्ये मिळाल्या नोकऱ्या


नवी दिल्ली : नेहमीच कुशल मनुष्यबळाला भारतीय माहिती तंत्रज्ञान आणि बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट क्षेत्रात संधी दिली जात असून, एक लाख 38 हजार जणांना या क्षेत्रात 2021 या आर्थिक वर्षात नोकरी मिळाली आहे. हे स्पष्टीकरण ‘दी नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज’ अर्थात ‘नासकॉम’ने दिले आहे.

नुकताच एक अहवाल बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजने सादर केला होता. ज्यात भारतीय आयटी क्षेत्रातील आउटसोर्सिंग कंपन्यांमध्ये रोबॉटिक प्रोसेस ऑटोमेशनमुळे जागतिक पातळीवर 2022 पर्यंत तीस लाख जणांच्या रोजगारावर गदा येईल, असा अंदाज त्या अहवालात व्यक्त करण्यात आला होता.

‘नासकॉम’ने त्या अहवालाला प्रत्युत्तर म्हणून आपले स्पष्टीकरण प्रसिद्ध केले आहे. तंत्रज्ञानात क्रांती होत असून, ऑटोमेशन वाढत असल्यामुळे पारंपरिक आयटी जॉब्ज आणि रोल्समध्येही बदल होऊन रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. नेहमीप्रमाणेच या उद्योगात स्किल्ड टॅलेंट अर्थात कुशल मनुष्यबळाला संधी मिळत राहील.

2021मध्ये 1,38,000 जणांना संधी मिळेल. या क्षेत्राने 2.5 लाख कर्मचाऱ्यांना डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांची प्रगती घडवली आहे. तसेच 40 हजार फ्रेशर्सनाही संधी दिली आहे. 2025पर्यंत आयटी-बीपीएम क्षेत्र 300 ते 350 अब्ज डॉलर उलाढालीचे होणार असल्याचे स्पष्टीकरणात ‘नासकॉम’ने म्हटले आहे. सध्या हे क्षेत्र 194 अब्ज डॉलरचे आहे.

ऑटोमेशनमध्ये मागील तीन वर्षांपासून सुधारणा होत आहे. त्यातून बीपीएम क्षेत्रात नव्या रोजगारांची निर्मिती झाली आहे. नासकॉम-किन्सेच्या अहवालानुसार बीपीएम क्षेत्र 180 ते 220 अब्ज डॉलरपर्यंत विस्तारण्याची शक्यता असल्यामुळे नवे रोजगार आणि विकासाची संधी आहे.

भारतीय आयटी क्षेत्राला महामारीच्या काळात मोठा फायदा झाला. तसेच विक्रमी करार या काळात झाले. 2020-21च्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत टीसीएसने 9.2 अब्ज डॉलरचे करार केले. संपूर्ण आर्थिक वर्षात केलेले करार 31.5 अब्ज डॉलरचे होते. इन्फोसिसला 14 अब्ज डॉलर्सची डील्स मिळाली. विप्रोने 12 मोठ्या डील्सवर सह्या केल्या. या कंपनीच्या 2020-21च्या शेवटच्या तिमाहीतील काँट्रॅक्टचे मूल्य 1.4 अब्ज डॉलर एवढे होते.

या क्षेत्रात शेकडो नव्या रोजगार संधी उपलब्ध असून, नव्या आणि दर्जेदार, कुशल मनुष्यबळासाठी आणि असलेले मनुष्यबळ टिकवण्यासाठी कंपन्या चांगले वेतन देण्यासही तयार आहेत. तत्पूर्वी ‘मनीकंट्रोल’ने दिलेल्या वृत्तानुसार, 2021-22मध्ये आघाडीच्या आयटी फर्म्स लाखभर फ्रेशर्सना संधी देऊ शकतील. त्याशिवाय अनुभवी प्रोफेशनल्सची संख्या वेगळीच आहे. अनेक कंपन्यांनी महामारीमुळे डिजिटायझेशनवर भर दिला आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर सर्व्हिसेसची मागणी वाढली आहे. त्यामुळे रोजगार संधी वाढत आहेत.