करोना प्रतिबंधक गोळी बनविण्यासाठी अमेरिकेची ३ अब्ज डॉलर्स गुंतवणूक

करोना महामारी मध्ये सर्वाधिक मृत्यूचा फटका बसलेल्या अमेरिकेने करोना प्रतिबंधक गोळी (अँटी कोविड टॅब्लेट) बनविण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतले असून ही गोळी विकसित करण्यासाठी ३ अब्ज डॉलर्स खर्च करण्याची तयारी दाखविली आहे. ही गोळी करोना विषाणूच्या संक्रमणापासून माणसाला वाचाविण्याचे काम करेल. २०२१ अखेरी ही गोळी तयार होईल आणि त्यासाठी केल्या जात असलेल्या गुंतवणुकीची घोषणा अमेरिकेचे संक्रमण रोग तज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी व्हाईट हाउस ब्रीफिंग मध्ये केली आहे.

सध्या करोना वरची जी औषधे उपलब्ध आहेत, ती करोना संक्रमण झाल्यावर जाणवणारी लक्षणे कमी करण्यासाठी आहेत. करोना प्रतिबंधक गोळीचे काम अजून प्राथमिक अवस्थेत आहे आणि त्याची परीक्षणे लवकरच सुरु होणार आहेत. या वर्षाखेर चाचण्या पूर्ण करण्यासाठी अर्थसहाय्य मिळाले तर हे काम वेगाने होऊ शकणार आहे. करोना लसीवर सरकारचे लक्ष आहेच.

इतकेच नव्हे तर भविष्यात अनेक विषाणू पासून असलेला धोका लक्षांत घेऊन अमेरिकेच्या स्वास्थ्य आणि मानव सेवा विभागाने गुरुवारी महामारीशिवाय अन्य आजारांवर औषधे तयार केली जात असल्याचे संकेत दिले आहेत. गेल्या वर्षात १८ अब्ज डॉलर्स खर्च करून रेकॉर्ड वेळात करोनावरील पाच लसी विकसित करण्यात यश मिळाले होते. नवीन जी गोळी तयार होत आहे, त्यामुळे करोना चा विषाणू सुरवातीलाच नष्ट होणार आहे. प्रसिद्ध फार्मा कंपनी मर्क मध्ये यावर काम सुरु आहे असे समजते.