तोक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांसाठी आर्थिक मदत लवकरच – विजय वडेट्टीवार


मुंबई : तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या वादळग्रस्त मच्छीमारांसाठी आर्थिक मदतीच्या निकषाबाबत मच्छीमारांच्या सर्व बाजू समजावून घेऊन सर्वानुमते निर्णय घेऊन त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

मंत्रालयातील दालनात तोक्ते चक्रीवादळामुळे वादळग्रस्त मच्छीमारांना आर्थिक मदतीचे निकष बदलून मिळावे यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार म्हणाले, मच्छीमारांना तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात बँकासोबत देखील चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. वादळग्रस्त मच्छीमारांना शासनाकडून मंजूर झालेली नुकसानीची रक्कम तात्काळ वितरित करण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेशही संबधित विभागाला देण्यात आले आहेत. यापूर्वी निसर्ग चक्रीवादळावेळी शासनाने जुन्या निर्णयांमध्ये आमुलाग्र बदल करून घेतल्यामुळे आपद्ग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ केली आहे.

निसर्ग चक्रीवादळातील आपद्ग्रस्तांकरिता राज्य शासनाकडून केंद्र सरकारला १०४० कोटी रूपयांचा प्रस्ताव पाठविला होता. केंद्र शासनाने फक्त २६८ कोटी रूपयांची मदत केली तर राज्य शासनाने ७८० कोटी रूपयांची मदत आपद्ग्रस्तांना केली आहे. मच्छीमारांच्या बाबतीत शासन सकारात्मक असून त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत सर्वानुमते योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

तोक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांना मदतीसाठी शासन सकारात्मक – उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई
मच्छीमार बांधवांनी मांडलेल्या सर्व मुद्यांवर शासन सकारात्मक कार्यवाही करेल. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेसही शासनाने अनेक नियम बदलून वादळग्रस्तांना मदत केली आहे. त्याचपद्धतीने तोक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छीमार यांनाही मदत देण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

महाराष्ट्र मच्छीमार कृति समितीने यावेळी मच्छीमार बांधवांच्या तोक्ते वादळातील झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. वाढवून मिळणारी मदत रोख रक्कम अथवा एखाद्या योजनेमार्फत मिळावी, मासळी सुकविणारे छोटे मत्स्यव्यावासायिक यांनाही मदत करावी, अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.