एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक


मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केली आहे. प्रदीप शर्मा यांना सात तासांच्या चौकशीनंतर अँटिलियाबाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आली.

एनआयएने सकाळी सहा वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत प्रदीप शर्मा यांच्या घराची झाडाझडती केल्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन बेड्या ठोकण्यात आल्या. एनआयएच्या ताब्यातील सचिन वाझे आणि संतोष शेलार यांच्या चौकशीत प्रदीप शर्मा यांचे नाव आल्यामुळे एनआयएने आजची कारवाई केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. शर्मा यांच्यावर मनसुख हिरेन यांच्या हत्येत सहभागी असल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रदीप शर्मा यांना लोणावळ्यातील मोठ्या रिसॉर्टमधून अटक करण्यात आली.

प्रदीप शर्मा मनसुख हिरेनच्या हत्येचा मास्टरमाईंड होते, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अटकेत असलेल्या विनायक शिंदे, संतोष शेलार आणि आनंद यादव यांच्यासह आणखी दोघांनी मनसुख हिरेन यांचे अपहरण करुन त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह रेतीबंदर खाडीत टाकला. हे सगळे प्रदीप शर्मा यांच्या जवळचे आहेत. प्रदीप शर्मा यांनी त्यांना पैसे आणि गाडी दिली. प्रदीप शर्माने या सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या.

फेब्रुवारी महिन्यात जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर बेवारसपणे सोडण्यात आली होती. त्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती.

प्रदीप शर्मा यांचे नाव त्यांच्या चौकशीतून समोर आले. प्रदीप शर्मा हे सचिन वाझे यांच्या जवळचे समजले जातात. यानंतर एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांचीही एनआयएने चौकशी केली होती. ही चौकशी काही महिने थांबली होती. पण एनआयएने आज सकाळी सीआरपीएफच्या ताफ्यासह मुंबईच्या अंधेरीतील त्यांच्या घरावर छापा टाकून झाडाझडती सुरु केली. अनेक तासांच्या झाडाझडती आणि चौकशीनंतर अखेर त्यांना अटक करण्यात आली.