आता निदर्शने करुन आपला रोष देखील व्यक्त करायचा नाही का?- चंद्रकांत पाटील


पुणे – शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर झालेल्या हाणामारीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. आता आपण निदर्शने करुन आपला रोष देखील व्यक्त करायचा नाही का? रोज सामनातून तुम्ही अग्रलेख लिहिणार आणि वाटेल त्या भाषेत बोलणार, त्याला काही आधार आहे का?, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

२० कार्यकर्ते परवानगी घेऊन निदर्शने करत होते. दगड, धोंडे त्यांच्या हातामध्ये होते असे म्हटले गेले. सीसीटीव्हीचे तपशील समोर येऊ द्या, मग सर्व काही स्पष्ट होईल. त्यांच्या हातामध्ये काहीही नव्हते. त्यांना निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी अटक देखील केली आहे. १५ दिवसांपूर्वी आमच्या कार्यालयासमोर देखील पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेकडून पोस्टर लावण्यात आले होते. काँग्रेसनेदेखील आमच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही काय त्यांच्यासोबत मारामाऱ्या केल्या का? त्यांनी त्यावेळी थोडा वेळ निदर्शने केली. काही वेळाने पोलिस त्यांना घेऊन गेले, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.


पुढे ते म्हणाले की, ही दंडुकेशाही चालणार नाही. भाजप, विश्व हिंदू परिषद किंवा ट्रस्टचा राममंदिर हा विषय नसून तो समस्त हिंदूंचा विषय आहे. हिंदूंच्या विषयावर व्यक्त व्हावे असे आम्हाला वाटते आणि तुम्हाला व्यक्त झाले नाही पाहिजे वाटते. जिथे हिंदुत्व सोडलं तिथेच तर अंतर निर्माण होण्यास सुरुवात झाली ना. तुम्ही आमच्यावर टिप्पणी करणार, तुमचे हिंदुत्व खोटारडं असे म्हणणार. राम मंदिर अतिशय मेहनतीने उभे राहत आहे. पण रोज नवीन मुद्दे काढले जात जात आहेत. काँग्रेसने आणि देशविरोधी ताकदीने जे करायचे ते चालवलेच आहे. तुम्ही राष्ट्रीय बाण्याचे आणि हिंदुत्ववादी म्हणवून घेता. मग त्यांना तुम्ही पाठिंबा कसा देता, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

कालची मुंबईतील घटना तुम्हाला क्लेशदायक वाटते का ? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, निश्चितच हे क्लेशदायक आहे. एका खुर्चीपायी… पण उद्या आमचे संजय राऊत अग्रलेखातून म्हणतील तुम्ही नाही का एका खुर्चीपायी अडून बसला. मात्र आम्ही लॉजिकल आहोत. आमचे १०५ आणि तुमचे ५४ आहेत. पण असो जाऊ द्या…पण काल जे काही झाले ते अंत्यत क्लेशदायक आहे. पण आमच्या कार्यालयाबाहेर १५ दिवसांपूर्वी बोर्ड लावण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही काही शिवसेना भवनच्या काचेवर काही चिटकवण्याचा प्रयत्न नाही केला.

चंद्रकांत पाटील ‌मराठा आरक्षणाच्या मुद्यावर म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशनाची मागणी करता करता नेहमीचे अधिवेशन आले आहे. आता त्यामध्ये मराठा, ओबीसी या विषयावर दोन दिवस चर्चेसाठी द्या. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जे कोणी रस्त्यावर उतरतील त्यांच्यात आम्ही सहभागी होऊ. अखेरपर्यंत लढा देऊ आणि कोणत्याही मार्गाने आरक्षण मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत.

पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल आणि राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात आणि त्यामध्ये भाजपा-सेना एकत्र येईल असे बोलले जात आहे, असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत घोषणा झाल्यावर चर्चा केली जाईल आणि संख्याबळाचा देखील विचार केला जाईल. तसेच मध्यावधी, शिवसेना-भाजपा एकत्र येणे हे सगळेच तर्क-वितर्क म्हणजे पहिल्यांदाच आपल्या समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा काळ चालला आहे. रोज एक नवीन पुडी मार्केट सोडली जाते. त्यामुळे कुठल्या कुठल्या पुडीवर बोलायचे हा एक प्रश्नच आहे.