बँक ऑफ अमेरिकेने वर्तवली आयटी क्षेत्रातील 30 लाख भारतीय कर्मचारी बेरोजगार होण्याची शक्यता


मुंबई : भारतातील आयटी कंपन्यात काम करणाऱ्या 30 लाख लोकांच्या नोकरीवर पुढच्या वर्षी म्हणजे 2022 साली गदा येण्याची शक्यता आहे. ही शक्यता बँक ऑफ अमेरिकेने जाहीर केलेल्या एका अहवालात वर्तवण्यात आली आहे. या नोकऱ्या ऑटोमेशन प्रक्रियेमुळे जाण्याची शक्यता आहे.

भारतातील विप्रो, कॉग्निजंट, इन्फोसिस या सारख्या बड्या आयटी कंपन्या आहेत, त्यामधील 30 लाख नोकऱ्या जाऊ शकतात, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. भारतासह अमेरिकेलाही ऑटोमेशनचा फटका बसणार असून त्या देशातीलही 10 लाख नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतातील आयटी कंपन्यांत आता जवळपास 90 लाखांहून जास्त लो स्किल कर्मचारी काम करतात. या लो स्किल कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर यांत्रिकीकरणाचा वापर अर्थात ऑटोमेशनमुळे गदा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतात आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कर्मचारी काम करतात. तसेच परदेशातील आयटी क्षेत्रात भारतातील अनेक लोक काम करतात. त्यांना ऑटोमोशनच्या प्रक्रियेचा फटका बसणार आहे. या क्षेत्रात ऑटोमेशन केल्यामुळे जवळपास 100 अब्ज रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारचा निर्णय या कंपन्यांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.

बँक ऑफ अमेरिकेच्या या अहवालात असे सांगण्यात आले आहे की भारत आणि चीन या दोन देशांना या ऑटोमेशनचा फटका मोठ्या प्रमाणात बसणार आहे. या दोन देशांच्या तुलनेत गल्फ देशांना, जपान या देशांना कमी प्रमाणात बसणार आहे.