सांगली जिल्ह्यातील विटा येथे शेतमालाच्या साठवणूकीसाठी गोदाम बांधण्यास मान्यता – बाळासाहेब पाटील


मुंबई : सांगली जिल्ह्यातील विटा येथे शेतकऱ्यांसाठी शेतमालाची साठवणूक सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत गोदाम बांधण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात सहकार मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार अनिल बाबर, राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापक संचालक दीपक तावरे, उपसचिव वळवी, सह निबंधक (प्रकल्प) रमेश शिंगटे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सहकार मंत्री पाटील म्हणाले, स्थानिक लोकप्रतिनिधी व कृषि उत्पन्न बाजार समिती, विटा यांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांसाठी शेतमालाची साठवणूक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांच्याकडून गोदाम बांधण्याकरिता मान्यता द्यावी अशी अनेक दिवसांपासून मागणी होती यास मान्यता देण्यात आली आहे. बाजार समितीने प्रस्तावित केलेल्या ८० आर जागेवर ३ हजार मे.टन क्षमतेची गोदामे उभारण्यात येणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समिती, विटा यांनी प्रस्तावित केलेल्या जागेवर स्थानिक प्राधिकरण यांनी बाजार समितीचा मंजूर केलेला नकाशा (Master plan) सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.