बेजोस यांच्या माजी पत्नी मेकेंझी यांनी दान केले १९८०० कोटी रुपये

अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांच्या माजी पत्नी मेकेंझी स्कॉट यांनी १९८०० कोटी रुपये दान केले आहेत. जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत सामील असलेल्या मेकेंझी यांचे एक वर्षातले हे तिसरे मोठे दान आहे. त्यांनी दान केलेल्या २.७ अब्ज डॉलर्स म्हणजे १९८०० कोटी रुपयातून भारतासह अनेक देशातील २८६ संस्था, विद्यापीठे, कला समूहांना मदत दिली जाणार आहे.

या संदर्भात मेकेंझी यांनी ब्लॉग पोस्ट केला असून त्यात जगासाठी काही चांगले करायचे असेल तर संपत्ती मुठभर लोकांच्या हातात राहून चालणार नाही असे म्हटले आहे. मेकेंझी यांची स्वतःची कोणतीही परोपकारी संघटना नाही. खासगी पातळीवरच त्या वेळोवेळी मोठ मोठ्या रकमा दान करत आल्या आहेत.

२०१९ मध्ये बेजोस यांच्यापासून घटस्फोट घेतल्यावर मेकेंझी यांच्या वाटणीला अमेझॉनचे ४ टक्के शेअर्स आले होते. त्यावेळी त्याची किंमत ३६ अब्ज डॉलर्स होती पण काही काळात शेअर किमंत वाढली आणि आता त्या शेअर्सची किंमत ६० अब्ज डॉलर्सवर आहे. मेकेंझी यांनी गेल्या ११ महिन्यात ८ अब्ज डॉलर्स दान केले आहेत. त्यांनी ५०० संस्थांना ६ अब्ज डॉलर्स २०२० या वर्षात दिले आहेत.

मेकेंझी दान, मदत मिळण्यासाठी गरजूंकडून अर्ज वगैरे मागवत नाहीत. दान दिलेल्या संस्थांची थेट यादी जाहीर केली जाते असे समजते.