महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांची डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल; गुन्हेगारांचा बिमोड करण्याची सूचना


मुंबई : मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात महिलांवर चोरांकडून होत असलेले हल्ले आणि त्यात महिलांचा होणारा मृत्यू याची गंभीर दखल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून गुन्हेगारीचा बिमोड करुन महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या, अशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांना पत्राद्वारे केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्टेशन येथे मोबाईल चोराचा प्रतिकार करत असताना विद्या पाटील मृत्युमूखी पडल्या. दुसऱ्या एका घटनेत कन्मीला रायसिंग या रिक्षाने जात असताना त्यांचामोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाला. या झटापटीत खाली पडून डोक्यास मार लागून त्यांचा मृत्यूझाला. तसेच वाडा येथील सुप्रिया गुरुनाथ काळे यांच्या घरी 11 जून 2021 या रोजी चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात गुन्हेगारांनी त्यांचा खून केला. यासंदर्भात त्वरीत कारवाईकरण्याच्या सूचना डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.

पत्रात डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे की, कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस विभागास सतर्क करण्यात यावे. महिलांविरुद्ध गुन्ह्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध तसेच सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई हाती घेण्यात यावी. ज्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्यांना लवकरात लवकर अटक करुन न्यायालयात जामीन मिळू नये यासाठी सरकारी वकिलांच्या माध्यमातून प्रभावी मांडणी करावी. या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करावी. तसेच 149 व 107 अंतर्गत गुन्हा प्रतिबंध होण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना सूचित करुन उचित कार्यवाही करावी, अशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.