भाजप कार्यकर्ते विटा, दगडे घेऊन शिवसेना भवनवर हल्ला करणार होते, सदा सरवणकर यांचा गंभीर आरोप


मुंबई – अयोध्येतील राम मंदिर उभारणीमधील कामात जमीन खरेदी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून शिवसेनेने यावरुन घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप संतापली असून भाजप जनता युवा मोर्चाकडून शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आल्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा वाद झाला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेना भवन परिसरात तुफान हाणामारी झाली असून अखेर पोलिसांना बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली आहे. दरम्यान भाजपची शिवेसना भवनावर हल्ला करण्याची योजना होती, असा गंभीर आरोप स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.

भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसैनिक शिवेसना भवनात जमले होते. पण जेव्हा शिवसेना भवनावर भाजपचे काही कार्यकर्ते विटा, दगड घेऊन हल्ला करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली, तेव्हा शिवसैनिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. त्यांना शिवसैनिकांनी थाबवले असता बाचाबाची झाल्याची माहिती स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. दरम्यान शिवसेना भवनावर हल्ला करण्याची भाजपची योजना होती असा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झालेली नसून माझ्या निदर्शनास आलेले नसल्याचे सांगत सदा सरवणकर यांनी भाजपचे आरोप फेटाळले आहेत.