अशोक चव्हाणांची आश्वासनपूर्ती; वाशिम जिल्ह्यातील यशवंतनगर ते पोहरादेवी-आमकिन्ही रस्त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर


मुंबई : वाशिम जिल्ह्यातील यशवंतनगर –कारखेडा-सोयजना-पंचाळा राज्य मार्ग 273 ते पोहरादेवी-आमकिन्ही रस्त्याचा विशेष दुरुस्ती कार्यक्रमाअंतर्गत दुरुस्तीचा 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आश्वासनपूर्ती केली.

श्री क्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी राज्यासह देशातील बंजारा समाज मोठ्या प्रमाणात येत असतो. भाविकांना येथे विनासायास जाता यावे, यासाठी पोहरादेवीला जाणारे रस्ते सुस्थितीत असावेत, अशी भाविकांची मागणी होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याचे मान्य केले होते.

त्यानुसार, वाशिम जिल्ह्यातील कारंजा-मानोरा मतदारसंघातील यशवंतनगर ते पोहरा देवी -आमकिन्ही (इजिमा 68) रस्ता या 22.70 किमी रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आला होता. यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वाहतुकीसाठी हा रस्ता महत्त्वाचा असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रमाअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता या रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.