40 लाख भूमिहीन लाभार्थ्यांना मिळाले हक्काचे घर – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ


मुंबई – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, महाआवास अभियानामध्ये आज गृहप्रवेश केलेली 3 लाख 23 हजार कुटुंबे आणि बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर असलेली 4 लाख 68 हजार कुटुंबे अशा एकूण ८ लाख कुटुंबांची सरासरी सदस्य संख्या लक्षात घेतली तर सुमारे 40 लाख लोकांना घरकुलाचे छत मिळाले आहे. कोरोनाचे संकट असतानाही सर्व यंत्रणेने एकजुटीने हे अभियान यशस्वी केले. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात आली. गवंडी प्रशिक्षण, घरकुल मार्ट, बहुमजली इमारती, गृहसंकुले यांसारखे वेगवेगळे प्रयोग करुन घरांचा दर्जा चांगला राहील यासाठी दक्षता घेण्यात आली. आता चालू वर्षात प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांनाही घरे देण्यात येतील. राज्यात ग्रामीण भागात स्वत:चे घर नाही असे एकही कुटुंब बाकी राहू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, ग्रामविकास विभागाने विविध विभागांच्या सहयोगातून महाआवास अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविले. अनुसूचित जाती, जमाती यांनाही सामाजिक न्याय, आदिवासी विकास यांच्या योजनेतील घरकुलांचा लाभ देण्यात आला. त्यामुळे वंचित घटकांचा सामाजिक स्तर उंचावण्यात या अभियानाचा मोठा फायदा झाला. यापुढील काळातही सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसुचित जातीतील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजनांकरिता भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, कोरोना संकटाच्या काळात ग्रामविकास यंत्रणेने महाआवास अभियानाद्वारे केलेली कामगिरी अभूतपूर्व अशी आहे. या योजनेद्वारे गोरगरीब, वंचित घटकांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळाला. अभियान काळात उद्दिष्ट निश्चित केलेले सुमारे ८ लाख घरकुलांपैकी आज 3 लाख 23 हजार जणांचा गृहप्रवेश झाला आहे. उर्वरीत लाभार्थीही महिन्याभरात गृहप्रवेश करतील. सामान्य लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये या अभियानाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ‘महाआवास अभियान-यशोगाथा’ या पुस्तिकेचे आणि राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाची दिनदर्शिका (शैक्षणिक वर्ष) चे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर ‘महा आवास’ संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.

20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले. अभियान कालावधीत 50 हजार 112 भूमीहीन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली. 3 लाख 69 हजार 495 घरकुलांना मंजूरी देऊन नवीन लाभार्थ्यांना या योजनांमध्ये सामावून घेण्यात आले. 8 हजार 815 ग्रामीण गवंड्यांना प्रशिक्षण देण्यात आले तर 13 हजार 295 ग्रामीण गवंड्यांचे प्रशिक्षण प्रगतीपथावर आहे. लाभार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी 320 डेमो हाऊसेस उभारण्यात आली असून बांधकामाचे साहित्य वाजवी दरात उपलब्ध करुन देण्यासाठी 612 घरकुल मार्ट सुरु करण्यात आली आहेत. याचबरोबर 42 हजार 180 लाभार्थ्यांना अनुदानाव्यतिरिक्त वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज मिळवून देण्यात आले आहे. तसेच घरकुल बांधण्यासाठी पुरेशी जागा नसल्यास 1 हजार 286 बहुमजली इमारती (जी+1 व जी+2) उभारुन तसेच पुरेशी जागा असल्यास 625 गृहसंकुले उभारुन उपक्रम यशस्वी करण्यात आले आहेत. अभियान कालावधीमध्ये पूर्ण झालेल्या घरकुलांपैकी 1 लाख 22 हजार 104 घरकुले मूलभूत नागरी सुविधांनी युक्त आहेत.

अभियान कालावधीत इतर शासकीय योजनांशी कृतीसंगम करण्यावर देखील भर देण्यात आला. या कृतीसंगमामधून ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 6,10,06,280 मनुष्यबळ निर्मिती करुन रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जलजीवन मिशनमधून 8 लाख 06 हजार 895 घरकुलांना नळाव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानमधून 9 लाख 32 हजार 102 घरकुलांना शौचालयाचा लाभ देण्यात आला. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमधून 7 लाख 27 हजार 031 गॅस जोडणी, सौभाग्य योजनेतून 7 लाख 51 हजार 150 विद्युत जोडणी व 7 लाख 51 हजार 140 लाभार्थ्यांना राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती मिशन मधून 8,10,031 लाभार्थ्यांना उपजीविका उपलब्ध करुन देण्यात आली आहे.