येत्या १५ ते २० दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर घेण्यात येईल शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय


मुंबई – १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारने शिक्षण संस्थांना दिले आहेत. पण, कशा पद्धतीने शाळा सुरू करायच्या याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट नसल्यामुळे संभ्रम कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शाळा सुरू करायला सांगताना त्या कशा पद्धतीने सुरू कराव्यात आणि त्याचं नियोजन कसे असेल याबाबत परिपत्रकात कोणत्याही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या नसल्यामुळेच हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याच मुद्यावर माध्यमांशी बोलतांना राज्यातील शाळा कधी सुरू होणार यावर भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी याबाबत सांगितले की, सध्या शाळा सुरु न करता फक्त ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवायचे आहे. तसेच येत्या १५ ते २० दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे . दरम्यान, परिपत्रकानुसार सरकारने 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत. पण असे असले तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग कसे सुरू करावेत, याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्याप देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळेच शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनामध्ये शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम कायम होते. याबाबत आज वर्षा गायकवाड आपली भूमिका स्पष्ट केली आहे.