विश्वनाथन आनंद बरोबर चिटींग केल्याची अब्जाधीश निखिल कामथची कबुली

बुद्धिबळाचा राजा विश्वनाथन आनंद यांच्याबरोबर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खेळताना चिटींग करून आनंदला हरविल्याची कबुली देशातील सर्वात तरुण अब्जाधीश निखिल कामथ यांनी दिली असून झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. निखिल ऑनलाईन ट्रेडिंग अॅप जीरोधाचा सहसंस्थापक असून त्याला वर्षाला १ अब्ज रुपये पगार मिळतो. त्यामुळे तो देशातील सर्वात तरुण अब्जाधीश ठरला आहे. कामथवर सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यावर त्याने आपली कृती मूर्खपणाची होती असे मान्य केले आहे.

कोविड १९ साठी मदत निधी गोळा करायचा म्हणून १३ जून रोजी चेस डॉट कॉमने जगजेत्ता विश्वनाथन आनंद यांच्यासोबत सेलेब्रिटी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती. त्यात कामथ यांनी आनंदला हरविल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला होता. या स्पर्धेत बॉलीवूड अभिनेता आमीर खान, रितेश देशमुख, क्रिकेटर युवराज चहल यांचासह दहा जणांचा समावेश होता.

चेस डॉट कॉमने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर निखिल कामथ यांनी चालूबाजी केल्याने त्याचे प्रोफाईल निलंबित केल्याचे समजते. या खेळात कामथ यांनी नियमांचे पालन केले नाही आणि बुद्धीबळ चालीसाठी सर्च इंजिनचा वापर केला यासाठी त्याला दोषी ठरविले गेले असल्याचे सांगितले जात आहे.

या संदर्भात निखिल कामथ यांनी केलेल्या ट्विट मध्ये आनंदला मी खरेखुरे हरविले हा विचार मूर्खपणाचा असल्याचे सांगून झाल्या प्रकाराबद्दल क्षमा मागितली आहे. त्याला उत्तर देताना विश्वनाथन आनंद यांनी हा सेलेब्रिटी सिमुलेशन इव्हेंट होता आणि जमलेले पैसे मदतनिधी म्हणून द्यायचे होते असे स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, ‘मी चांगला आणि नियमानुसार खेळलो आणि तशीच उमेद मी बाकी स्पर्धकांकडून केली होती.’