मुंबई : आज (14 जून) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 53 वा वाढदिवस असून त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी कार्यकर्त्यांची रिघ लागते. पण मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी घेतला आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसेकडून खास व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कृष्णकुंज’बाहेर मनसे सैनिकांकडून फुलांची सजावट
जातीय विद्वेषाने दुभंगलेला मराठी समाज महाराष्ट्र म्हणून एकत्र आणण्याच्या राजसाहेबांच्या आत्मविश्वासाला आदिशक्तीचं सामर्थ्य लाभो… राजसाहेब दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! 💐 #राजठाकरे #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रसैनिक #HappyBirthdayRajThackeray pic.twitter.com/FSfrEsWQMr
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 14, 2021
असे असले तरी राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा उत्साह मध्यरात्रीपासूनच दिसून येत आहे. कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे दादरमधील कृष्णकुंज बंगल्याच्या गेटवर मध्यरात्री फुलांची सजावट केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, शुभेच्छा देण्यासाठी कृष्णकुंजवर येऊ नये, स्वत:च्या घरीच थांबावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते.
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो… माझ्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांना नम्र आवाहन!#महाराष्ट्रसैनिक #लढाकोरोनाशी #MaharashtraFightsCorona pic.twitter.com/aCx1f4m3uW
— Raj Thackeray (@RajThackeray) June 11, 2021
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करणारे पत्रच ट्विट केले होते. मागील वर्षीप्रमाणे हे वर्ष देखील बिकट आहे. कोरोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सुटलेला नाही. लॉकडाऊन उठला असला तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणे मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल. त्यामुळे माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच राहा. जिथे आहात, तिथे सुरक्षित रहा. कुटुंबियांची आणि आसपासच्या लोकांची काळजी घ्या. तुम्ही प्रेमाने याल आणि आपली भेट होणार नाही, असे होऊ नये. थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार असल्याचे राज यांनी पत्रात म्हटले आहे.