करोना लस घ्या, टेस्ला कार, सोने लडी, आयफोन जिंका 

जगभरात करोना लसीकरण वेगाने व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लसीकरण करून घेण्यास नागरिकांना प्रोत्साहन म्हणून अनेक देशात अनेक आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. भारतात मोफत बिर्याणी, मोफत बिअर यासारख्या ऑफर्स दिल्या जात आहेत. हॉंगकॉंग मध्ये मात्र फारच आकर्षक ऑफर्स दिल्या गेल्या असून यात लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना टेस्ला इलेक्ट्रिक कार, सोन्याची बिस्किटे आणि लडी, आयफोन, शॉपिंग व्हाऊचर जिंकण्याची संधी मिळणार आहे.

चीनचे विशेष प्रशासनिक क्षेत्र असलेल्या या देशात अधिकारी आणि स्थानिक व्यापारी, उद्योजकांनी यासाठी हातमिळवणी केली आहे. ३१ ऑगस्ट पूर्वी लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांना टेस्लाची ४८ लाख रुपये किमतीची इलेक्ट्रिक कार, सोन्याच्या विटा, आयफोन्स, रोख रक्कम, पगारी रजा अश्या अनेक ऑफर्स असून लॉटरी पद्धतीने त्या वस्तू जिंकता येणार आहेत. हॉंगकॉंगची लोकसंख्या ७५ लाख असून येथे लसीकरणाचा वेग फारच मंद आहे.

ऑस्ट्रेलियन इंडस्ट्रीयल प्रॉपर्टी फर्म गुडमनच्या स्थानिक कार्यालयाने लॉटरी ड्रॉ काढून आयफोन सारखी बक्षिसे देण्याची तयारी केली आहे आणि हे ड्रॉ सप्टेंबर मध्ये काढले जाणार आहेत. देशातील सर्वात मोठी डेव्हलपर सन हुंग काई प्रॉपर्टी लिमिटेड आणि बिझिनेस टायकुन ली शाउकीच्या हेंडरसन लँड डेव्हलपर कंपनीने सोन्याच्या विटा, लडी अशी पारितोषिके ठेवली आहेत.