स्वीडनने जगासमोर ठेवले आहे ‘वेस्ट मॅनेजमेंट’चे उत्कृष्ट उदाहरण


प्रदूषण, रीसायकल न करता येणाऱ्या कचऱ्याचे सातत्याने वाढते प्रमाण ही आजच्या काळातली गंभीर समस्या जगातील सर्वच देशांना भेडसावत आहे. अशा वेळी स्वीडनने सर्व जगाच्या समोर ‘वेस्ट मॅनेजमेंट’चे उत्तम उदाहरण ठेले आहे. संपूर्ण स्वीडन देशामध्ये एकत्र केल्या जाणाऱ्या कचऱ्यापैकी सुमारे पन्नास टक्के कचरा रिसायकल केला जातो. येथील नागरिकांना घरातील कचरा ‘डम्पिंग यार्ड’मध्ये पाठविण्याची गरज लागत नाही. सर्व प्रकारच्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणे अनिवार्य असून, निरनिरळ्या रंगांच्या पिशव्यांमध्ये या कचऱ्याची निर्धारित वर्गीकरणाच्या अनुसार विभागणी केली जाते.

येथील नागरिक घरामधील कचऱ्याची सात निरनिरळ्या प्रकारे विभागणी करतात. यातील प्रत्येक प्रकारच्या कचऱ्यासाठी ठराविक रंगाची पिशवी वापरणे बंधनकारक असते, जेणेकरून प्रत्येक घरातून गोळा केला जाणाऱ्या कचऱ्याचे पिशवीच्या रंगानुसार वर्गीकरण करणे शक्य होते. घरामधील कचरा रिसायकल कसा केला जावा याची आगळी पद्धत येथील नागरिकांनी अवलंबली आहे. स्वीडनमधील जवळजवळ सर्व नागरिक ‘सेव्हन बॅग रीसायकलिंग’ या उपक्रमामध्ये सहभागी झाले असून, प्रत्येकजण आपल्या घरातील कचरा सतत निरनिराळ्या प्रकारांमध्ये विभागत असतो. रिसायकल न करता येण्याजोगा कचरा (टिश्यू पेपर, लहान मुलांचे डायपर इत्यादी) पांढऱ्या पिशवीमध्ये टाकला जातो. तर कोणत्याही धातूने बनलेल्या निरुपयोगी वस्तू ब्राऊन रंगाच्या बॅगमध्ये टाकल्या जातात.

टाकून देण्याजोगे अन्नपदार्थ, भाज्यांची, फळांची साले इत्यादी ओला कचरा हिरव्या पिशवीमध्ये टाकला जातो, तर कागद, जुनी बिले, वर्तमानपत्रे इत्यादी वस्तू निळ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये टाकल्या जातात. कपड्याच्या वस्तू, निरुपयोगी कपडे गुलाबी पिशवीमध्ये टाकले जात असून, प्लास्टिकच्या वस्तू लाल रंगाच्या पिशवीमध्ये टाकल्या जातात, तर हलक्या पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये पुठ्ठ्याच्या वस्तू टाकल्या जातात. अशा प्रकारे घरातील कचरा निरनिराळ्या रंगांच्या पिशव्यांमध्ये टाकला जात असल्याने हा कचरा रीसायकलिंग प्लांटमध्ये नेला गेल्यानंतर कोणत्या पिशवीमध्ये कोणत्या प्रकारचा कचरा आहे हे त्या पिशवीच्या रंगानुसार ओळखता येणे सहज शक्य होते आणि परिणामी कचऱ्याचे वर्गीकरण करणेही सोपे होते.

कचऱ्याच्या पिशव्या वर्गीकरणाच्या अनुसार वेगवेगळ्या करण्याचे काम रीसायकलिंग प्लांटमधील स्वयंचलित स्कॅनिंग सिस्टम्सद्वारे केले जाते. त्यानंतर या पिशव्या रंगांच्या अनुसार निरनिराळ्या मेटल कंटेनर्समध्ये वेगळ्या केल्या जातात. हिरव्या पिशाव्यांमधील ओला कचरा रिसायकलिंग प्लांटमधेच ‘प्रोसेस’ केला जाऊन त्यापासून बायोगॅस तयार केला जातो. याच बायोगॅसचा वापर सार्वजनिक बसेससाठी इंधनाच्या रूपात केला जातो. त्याचप्रमाणे इतर पिशाव्यांमधील कचऱ्याचे देखील रीसायकलिंग करण्यात येत असते. कचरा नागरिकांच्या घरामध्येच वर्गीकृत केला जात असल्याने व खूप जास्त कचरा साठत नसल्याने पंधरा दिवसांततून एकदा कचरा गोळा केला जातो. जो कचरा रीसायकल केला जाणे शक्य नसते, तो कचरा जाळून त्यापासून विद्युतनिर्मिती केली जाते. यामुळे विद्युत निर्मितीसाठी नैसर्गिक इंधनांची आवश्यकता कमी झाली असली, तरी रिसायकल न करता येणाऱ्या वस्तू जाळल्यामुळे धोकादायक वायू वातावरणात सोडले जाण्याचा धोका मात्र आहे. अशा प्रकारचे वेस्ट मॅनेजमेंट सध्या स्वीडन आणि नॉर्वे या दोन्ही देशांनी अवलंबले आहे.

Leave a Comment