मराठवाड्याला वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणार – उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत


जालना : भविष्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेत त्यानुसार आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करून वीजेचे जाळे अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येत असून वीजेच्या बाबतीत मराठवाड्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन मराठवाड्याला वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. जालना तालुक्यातील उटवद व घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे 132 के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन ऊर्जामंत्री राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, मराठवाड्यातील वीजेची असलेली परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आपण मराठवाड्याचा दौरा करत असून वीजेच्या बाबतीमध्ये मराठवड्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन वीजेच्या बाबतीत मराठवाड्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. उटवड येथे 132 के.व्ही. उपकेंद्र हे राजेश भैया टोपे हे ऊर्जामंत्री असताना मंजूर करण्यात आले होते. हे उपकेंद्र या ठिकाणी व्हावे यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल यांनी पाठपुराव्याने तसेच या भागातील नागरिकांच्या मागणीमुळे या केंद्रासाठी 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत या उपकेंद्राचे भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत असल्याचे सांगत या उपकेंद्राच्या माध्यमातून या परिसरातील 90 गावांना योग्य दाबाने व सुरळीतपणे वीजेचा पुरवठा होणार आहे. तसेच तीर्थपुरी येथील उपकेंद्रासाठीही 42 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असुन यामुळे परिसरातील अनेक गावांना याचा मोठा फायदा होणार असल्याचेही उर्जामंत्री राऊत यांनी यावेळी सांगितले.

ऊर्जा विभागामार्फत कृषीपंपाना वीज जोडणी, मुख्यमंत्री सौरयोजना यासारख्या अनेक योजना राबविण्यात येत असुन पीएम कुसुम योजनाही लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे सांगत या योजनांचा लाभ सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सिंगल विंडो सिस्टीमही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. वीजेच्या उत्पादनापासुन ते पुरवठ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. यासाठी वीज वापरणाऱ्या प्रत्येकाने वीजदेयक भरण्याचे आवाहनही ऊर्जामंत्री राऊत यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री सौर योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातुन 23 अर्ज प्राप्त झाले असुन या अर्जासोबत विद्युत विभागाशी निगडीत असलेल्या विकास कामांना मंजुरी देऊन आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगत राज्यातील सर्वसामान्यांना सुरळीतपणे वीजेचा पुरवठा व्हावा यादृष्टीने विद्युत विभाग पुर्ण क्षमतेने काम करत असुन लॉकडाऊनच्या काळात विद्युत विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करत सामान्यांना अखंडित व सुरळीतपणे चोवीस तास वीजेचा पुरवठा करण्यात आल्याचेही ऊर्जामंत्री राऊत यांनी यावेळी सांगितले.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, जालना जिल्ह्याचे अर्थकारण हे शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला योग्य दाबाने व सुरळीतपणे वीज प्राप्त झाली तरच या अर्थचक्राला गती मिळणार आहे. उटवद व तीर्थपुरी या भागात वीजेच्या अनेक समस्या आहेत. 33 के.व्हीवर अतिरिक्त वीजेचा ताण असल्यामुळे वीज वितरणामध्ये अनेकवेळा समस्यांचा सामना करावा लागत होता. गतकाळात आपण उर्जामंत्री असताना या ठिकाणी हे उपकेंद्र मंजूर केले होते. परंतु काही कारणास्तव ते पूर्ण करता आले नाहीत. परंतु आज यानिमित्ताने या भागात हे उपकेंद्र होत असल्याने उटवद येथील केंद्रातून 90 तर तीर्थपुरी येथील केंद्रातून 44 गावांना सुरळीत व अखंडितपणे वीजेचा पुरवठा होणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी वस्त्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक राहुन आपली शेती करतात. या वस्त्यांना चोवीस तास वीजेचा पुरवठा व्हावा यादृष्टीकोनातुन प्रत्येक 33 के.व्ही ला एसडीटी (स्पेशल डिजाईन ट्रान्सफार्मर) जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देत या एसडीटी कामे सुरु करण्यात येत आहेत. तसेच वीजेचा अतिरिक्त ताण असलेल्या 33 के.व्ही. उपकेंद्रांच्या पॉवर ट्रान्सफार्मची क्षमता वाढ करण्यात यावी, एबी केबलही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्याबरोबरच जालना जिल्ह्यातील अनेक गावात गावठाण फिडर व शेतीफिडरची एकच लाईन असुन या लाईन स्वतंत्र करण्यात याव्यात.

उर्जा विभागात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पदे रिक्त असुन ही पदे तातडीने भरण्यात यावीत. तसेच मुख्यमंत्री सौर उर्जा योजनेमधील प्रस्ताव मंजुर करण्याची मागणी करत दोनही ठिकाणची 132 के.व्ही.ची कामे जलदगतीने व दर्जेदारपणे पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी व्यक्त केली. उटवद येथील सरपंचांनी या उपकेंद्रासाठी आपली सहा एकर जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचे आभारही यावेळी व्यक्त केले.