एक जुलैपासून दंडकारण्य अभियानास प्रारंभ – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात


शिर्डी : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी पुढील पिढ्यांसाठी दूरदृष्टीतून सुरू केलेले दंडकारण्य अभियान मोठी लोकचळवळ ठरली आहे. सध्या असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मागील महिन्यात झालेली ऑक्सिजनची कमतरता या सर्व बाबींमुळे निरोगी जीवन व प्राणवायूसाठी वृक्षारोपण, संवर्धन व पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे केले. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे जयहिंद लोकचळवळ, अमृत उद्योग समूहातील सर्व संस्था, सर्व सेवाभावी संस्था, विविध शासकीय विभाग, शाळा व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोळाव्या दंडकारण्य अभियानाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी अत्यंत दूरदृष्टीतून पुढील पिढ्यांसाठी दंडकारण्य अभियान सुरु केले. मागील पंधरा वर्षात हे अभियान मोठी लोकचळवळ झाली आहे. या अभियानाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली असून यामध्ये तालुक्यातील नागरिक व सहकारी संस्थांचा मोठा वाटा राहिला आहे. मागील वर्षी व या वर्षी आलेल्या कोरोना संकटांत जीवन काय आहे हे सर्वांना कळले आहे. प्राणवायू व चांगल्या जीवनासाठी पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असून मानवाने यापूर्वी केलेल्या दुर्लक्षामुळे ग्लोबल वार्मिंगच्या समस्या, प्रदूषण, वादळे, दुष्काळ असे अनेक नैसर्गिक संकटे माणसावर आली. या सर्वांसाठी आपण सर्वांनी वृक्षसंवर्धन व पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे.

यावर्षी एक जुलैपासून दंडकारण्य अभियानाचा प्रारंभ होत असून यामध्ये तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षांचे रोपण, गावोगावी मोकळ्या जागेत, डोंगर व गायरानावर विविध वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून शेतांच्या कडेला ही नारळ, लिंबू, जांभूळ, शेवगा, आंबा, चिंच हे उपयोगी वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. चंदनापुरी घाट, क-हे घाट, माहुली घाट या घाटांमध्ये विविध फुलांचे रोपण करण्यात येणार आहे या वर्षीच्या दंडकारण्य अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले

आमदार डॉ.तांबे म्हणाले की, दंडकारण्य अभियान ही संगमनेर तालुक्याची वेगळी ओळख आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या दिशादर्शक कामातून वृक्षसंवर्धन संस्कृती राज्यात वाढली आहे. शासनानेही अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्ये दंडकारण्य अभियानातून विविध ठिकाणी घनदाट वनराई निर्माण करण्यात येणार आहे. सहकारी संस्थांचा यामध्ये महत्त्वाचा वाटा असून मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या वर्षीच्या दंडकारण्य अभियानात तालुक्यातील आबालवृद्ध युवक, नागरिक सर्व सेवाभावी संस्था व सहकारी संस्थांनी आपले सक्रिय योगदान द्यावे असे ते म्हणाले

दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, एका विषाणूने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क लावणे भाग पडले आहे. भविष्यात ऑक्सिजनमुळे पाठीवर सिलिंडर लागू नये यासाठी वृक्षारोपण संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांनी आपल्या घराच्या परीसरात कढीपत्ता, लिंबू ,आवळा या उपयोगी झाडांच्या रोपण करावे याप्रसंगी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक बाळासाहेब उंबरकर यांनी केले तर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी आभार मानले.