इजिप्तने करून दिली संपूर्ण जगाला सौंदर्यप्रसाधनांची ओळख


इजिप्त देशाची संस्कृती प्राचीन काळी अस्तित्वात असलेल्या सर्वात संपन्न संस्कृतींपैकी एक असून, त्या संस्कृतीशी निगडित अनेक रोचक तथ्ये, अनेक ऐतिहासिक संशोधनांच्या द्वारे प्रसिद्ध केली गेली आहेत. त्यांपैकी एक महत्वाचे तथ्य हे, ही आजच्या काळामध्ये स्त्रियांच्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय महत्वाचे स्थान असलेली आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल असलेली सौंदर्यप्रसाधने आणि त्यांची निर्मिती, ही संपूर्ण जगाला इजिप्तने दिलेली देणगी आहे. आजच्या काळामध्ये सर्रास वापरली जाणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांचा शोध आधुनिक काळातला आहे असे जरी अनेकांना वाटत असले, तरी सौंदर्यप्रसाधनांचा वापर अगदी प्राचीन काळापासून रूढ होता. इजिप्त देशाची संस्कृती याचे उदाहरण म्हणता येईल. प्राचीन काळी इजिप्शियन स्त्रिया आणि पुरुषही सौंदर्यप्रसाधनांचा सढळ हस्ते वापर करीत असत. त्या काळी आय शॅडो, आय लायनर, लिपस्टिक आणि रूज ही प्रसाधने सर्रास वापरली जात असत.

तत्कालीन इजिप्शियन लोक सौंदर्यप्रसाधनांचा वापर केवळ चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी करीत नसून, त्यांच्या लेखी सौंदर्यप्रसाधनांना पारंपारिक महत्वही होते. शारीरिक सौंदर्य एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग समजला जात असून, या लोकांचा, विशेषतः स्त्रियांचा पुष्कळसा वेळ प्रसाधन करण्यात खर्च होत असे. ख्रिस्तपूर्व २०३० ते १६५० या काळामध्ये सौंदर्यप्रसाधनांचा वापर अतिशय लोकप्रिय असून, प्रसाधनांच्या वापरासोबत त्वचेची देखभाल करण्यासाठी अनेक घरगुती उपायही या काळामध्ये अतिशय लोकप्रिय होते. चेहऱ्याची त्वचा नितळ आणि सुंदर रहावी या करिता स्त्रिया दुधामध्ये डेड सी सॉल्ट मिसळून त्यापासून स्क्रब तयार करीत असत. हा स्क्रब चेहऱ्याला हळुवार चोळून लावल्याने त्वचेवरील मृतपेशी नाहीशा होऊन त्वचा नितळ दिसत असे. तसेच त्वचा सतेज आणि मुलायम राहण्यासाठी दुध आणि मध मिसळून तयार केलेला फेस मास्कही त्याकाळी अतिशय लोकप्रिय उपचार असे.

त्वचेला आर्द्रता मिळावी यासाठी त्या काळी फुले आणि इतर नैसर्गिक औषधींपासून तयार केलेल्या तेलांचा वापर सर्वमान्य असून, शरीराला क्वचित येणारी दुर्गंधी हटविण्यासाठी सुगंधी द्रव्यांचा धूर घेण्याची पद्धतही अस्तित्वात होती. त्वचेवरील नको असलेली लव (केस) हटविण्यासाठी मध आणि साखरेचा वापर करण्याची ‘वॅक्सिंग’ची युक्तीही इजिप्शियन मंडळींचीच. तत्कालीन इजिप्शियन लोकांसाठी सौंदर्य प्रसाधनांचे महत्व मोठे असून ही प्रसाधने साठविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बरण्या अतिशय खास, मौल्यवान रत्नांचा, सोन्या-चांदीचा वापर करून बनविल्या जात असत. या सौंदर्यप्रसाधनांमध्ये आयशॅडो, आयलायनर आणि लिपस्टिक ही प्रसाधने विशेष प्रसिद्ध असत. आयशॅडो तयार करण्यासाठी पशुंपासून प्राप्त केल्या गेलेल्या चरबीमध्ये किंवा वनस्पती तेलामध्ये मॅलकाईट पावडर मिसळली जात असे.

उष्ण हवामानापासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी आणि डोळ्यांना थंडावा मिळावा या करीता आयलायनर, किंवा काजळाचा वापर प्रचलित होता. तसेच काजळाच्या वापराने दृष्ट लागत नसल्याची मान्यता त्याही काळामध्ये रूढ होती. ओठांसाठी प्रामुख्याने लाल रंगाला प्राधान्य दिले जात असून, वनस्पती तेलामध्ये काव(गेरू) घालून हा रंग तयार केला जात असे. सौंदर्यसम्राज्ञी क्लियोपात्रा ओठांचा रंग लाल करण्यासाठी कीटक ठेचून त्यांचे रक्त वापरत असल्याचेही म्हटले जात असे.

Leave a Comment