हरवले, आणि पुन्हा कधी गवसलेच नाही !


एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती कोणताही मागमूस न ठेवता गायब होण्याची घटना दुर्मिळ असली, तरी आजवर अनेकदा घडून गेली आहे. जागतिक इतिहासामध्ये अशा अनेक घटनांचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये केवळ एखादीच नाही, तर अनेक व्यक्ती अचानक गायब झाल्या, आणि पुन्हा कधी कोणाच्या दृष्टीस पडल्याच नाहीत. या व्यक्ती नेमक्या कुठे गेल्या, त्यांचे पुढे काय झाले, याचा कसलाच मागमूस लागू शकला नाही. उदाहरण द्यायचे झाले, नॉर्थ कॅरोलिना येथे सोळाव्या शतकामध्ये घडलेल्या अशाच एका घटनेचे देता येईल. सोळाव्या शतकामध्ये नॉर्थ कॅरोलिना येथील रोनाओके आयालंड येथे ब्रिटीश नागरिकांची वसाहत होती. या वसाहतीचा म्होरक्या इंग्लंडला काही आवश्यक सामान आणण्यासाठी गेला असता, या वसाहतीतील सर्व माणसे रातोरात गायब झाली. या वसाहतीचा म्होरक्या परतल्यानंतर त्याला या बेटावर रिकाम्या घरांच्या शिवाय इतर काहीच आढळले नाही. बेटावरील वसाहतीतील लोक अचानक कुठे गायब झाले याचाही शोध लागू शकला नाही.

१८७२ साली न्यूयॉर्क हून निघालेले मेरी सेलेस्ते हे प्रवासी जहाज, महिन्याभराच्या सफरीनंतर अचानक गायब झाले. त्यानंतर काही काळाने आणखी एका जहाजाला, मेरी सेलेस्ते समुद्रामध्ये आढळली. मेरी सेलेस्तेची पाहणी केली गेली असता, या जहाजावर कप्तान, कर्मचारी किंवा प्रवासी कोणाचाच पत्ता नव्हता. सहा महिने पुरेल इतके अन्नधान्य या जहाजावर उत्तम स्थितीत होते, पण या जहाजामधून प्रवास करीत असलेले सर्व लोक कुठे गेले हे आजतागायत न उलगडलेले रहस्य आहे. अशीच रहस्यमयी घटना ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या बाबतीत ही घडली. १९६७ साली हॅरी होल्ट ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान असून, त्या वर्षीच्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये होल्ट समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेले, ते कधी परतलेच नाहीत. त्यांच्या शोधार्थ अनेक शोध मोहिमा आयोजिल्या गेल्या मात्र सर्व प्रयत्न फोल ठरले. होल्ट यांचा काहीच पत्ता लागू शकला नाही.

१९४५ साली अमेरिकन नौसेनेच्या पाच टॉर्पिडो विमानांचे ‘फ्लाईट 19’ नामक फॉर्मेशन फ्लोरिडा येथील फोर्ट लाऊडरडेलवरील विमानतळावरून बहामाज येथे जाण्यासाठी निघाले. मात्र वाटेतच ही पाचही विमाने गायब झाली. सोबत या विमानांमध्ये प्रवास करीत असलेले चौदा नौसैनिकही गायब झाले. या विमानांकडून कोणत्याही प्रकारचा धोक्याचा संदेश विमानतळांवर पाठविला गेला नसल्याने सर्व विमाने एकत्र कशी गायब झाली हे रहस्य न उलगडणारे होऊन बसले, या विमानांच्या शोधार्थ अमेरिकेने हायड्रोप्लेन्सही पाठविली, मात्र त्या गायब झालेल्या विमानांचा कोणताही शोध लागू शकला नाही. ही विमाने ज्या क्षेत्रामध्ये गायब झाली, तेच क्षेत्र आज ‘बर्म्युडा ट्रँगल’ या नावाने ओळखले जाते.

Leave a Comment