श्री एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला येथे रोपवेसाठी सामंजस्य करार


मुंबई : पुणे जिल्ह्यातील श्री एकवीरा देवी मंदिर येथे तसेच राजगड किल्ला येथे रोपवे मार्गाच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक सुसाध्यता अहवाल तयार करणे, निविदा व्यवस्थापन प्रक्रिया राबविणे यासाठी आज राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय पोर्ट रेल व रोपवे महामंडळ (आयपीआरसीएल) यांच्यासोबत पर्यटन संचालनालयाचा (डीओटी) सामंजस्य करार करण्यात आला. त्याचबरोबर राज्यातील कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) यांच्यासमवेतही आज सामंजस्य करार करण्यात आला.

हे दोन्ही रोपवे प्रकल्प बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर बांधण्याचे प्रस्तावित आहे. पर्यटन विभागाचा हा पथदर्शी प्रकल्प असेल. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर, भारतीय पोर्ट रेल व रोपवे महामंडळाचे संचालक अनिलकुमार गुप्ता, सहकारी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री ठाकरे म्हणाले, आज करण्यात आलेले दोन्ही सामंजस्य करार राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन देणारे आहेत. एकविरा देवी मंदीर व राजगड किल्ला ही ठिकाणे राज्याची शक्तीपीठ व भक्तीपीठ आहेत. याठिकाणी रोपवे झाल्यास भाविक, पर्यटकांसाठी सुविधा निर्माण होणार आहे. आज झालेल्या करारानुसार भारतीय पोर्ट रेल व रोपवे महामंडळाने सर्व बाबींची एका वर्षात पूर्तता करुन पुढील वर्षी या दोन्ही ठिकाणी भूमीपूजन करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याने कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या करारामुळे राज्यातील कृषी पर्यटनाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.

राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, कोरोनामुळे दीड वर्षापासून प्रत्यक्षात पर्यटन बंद असले तरी भविष्यात राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने विभागाने अनेक निर्णय घेतले आहेत. राज्याचे बीच शॅक धोरण, कृषी पर्यटन धोरण, कॅराव्हॅन पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. आता साहसी पर्यटन धोरणही लवकरच जाहीर होत आहे. आज करण्यात आलेल्या दोन सामंजस्य करारांमुळे एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला येथील पर्यटनाला तसेच राज्यात कृषी पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषद आयोजित करून आपण जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. ज्यास सुमारे 20 ते 25 देशांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. रोपवे व कृषी पर्यटन या दोन्ही प्रकल्पांसाठी आयपीआरसीएल आणि एमसीडीसी यांच्या माध्यमातून राज्याच्या पर्यटनात महत्वपूर्ण भर पडेल, असे त्यांनी सांगितले.

आज झालेल्या दोन्ही सामंजस्य कराराची माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली. ते म्हणाले की, एकविरा देवी मंदीर हे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे. त्याच्या जवळच कार्ला लेणी हे पर्यटक आकर्षण आहे. एकविरा देवी मंदिरात दरवर्षी 7 ते 8 लाख भाविक पर्यटक येतात. राजगड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची सुमारे 25 वर्षे राजधानी होती. त्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. ट्रेकिंगसाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे. या दोन्ही ठिकाणी रोपवेच्या विकासामुळे पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली.