रत्नागिरी जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्येही मिळणार आता कोरोना लस


रत्नागिरी – कोरोना लसीकरण आता जिल्ह्यातील खासगी संस्थांमध्येही सुरु होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी 10 खासगी वैद्यकीय संस्थांना कोरोना लसीकरण केंद्र म्हणून परवानगी दिली आहे. पण खासगी हॉस्पिटलना कोरोना लसीकरणाची परवानगी देताना काही अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ज्या जागेत लसीकरण करणार आहे त्या जागेत प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरिक्षण कक्ष अशा 3 खोल्या असाव्यात. निरीक्षण कक्षाला प्रवेशद्वार आणि बाहेर जाण्याचा मार्ग स्वतंत्र असणे आवश्यक आहे. तसेच प्रतिक्षा कक्षामध्ये हात धुण्याची व्यवस्था व सॅनिटायझरची सोय असावी.

लसीकरणाशी संबंधित आवश्यक असणाऱ्या शीतसाखळी, हबकटर, अत्यावश्यक औषधांची व्यवस्था, लसीकरण संदर्भातील आरोग्य शिक्षण साहित्य, लसीकरण करताना डॉक्टरची उपस्थिती लसीकरण कक्षामध्ये आवश्यक आहे़. लस देणारा कर्मचारी प्रशिक्षीत असावा. लसीकरण हे संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून करावे. लस दिल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक राहील.

लाभार्थ्याला लस दिल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटे निरिक्षण कक्षात थांबवणे गरजेचे आहे. मान्यताप्राप्त लस निर्मात्यांकडूनच रुग्णालयांनी परस्पर लससाठा खरेदी करावयाचा आहे. शासनाकडून लस पुरवठा करता येणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांच्या अधिन राहून लसीकरण सत्र राबवायचे आहे.

जिल्ह्यात मान्यता देण्यात आलेल्या खासगी वैद्यकीय संस्था

  • परकार हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, रत्नागिरी
  • इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, रत्नागिरी
  • निर्मल बाल रुग्णालय, रत्नागिरी
  • शिव श्री हॉस्पिटल, रत्नागिरी
  • चिरायू हॉस्पिटल, रत्नागिरी
  • शिवतेज शिक्षण संस्था संचालीत योगीता डेंटल महाविद्यालय, खेड
  • फिनोलेक्स इंडस्ट्रीज असोसिएशन, खेड
  • यश फाऊंडेशन, रत्नागिरी
  • लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन, खेड
  • जे.एस. डब्ल्यू.एनर्जी लिमिटेड, जयगड

आज अखेर रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय संस्थांमार्फत 2,53,538 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये 17,900 आरोग्य कर्मचारी, 35,736 फ्रंटलाईन वर्कर, 27,363 18 ते 44 वयोगट, 87,101 पंचेचाळीस ते साठ वयोगट आणि 85,438 साठ वर्षावरील व्यक्तींचा समावेश आहे.