पुण्यातील पोलीस मुख्यालयातील बांधकामाच्या दर्जावरुन भडकले अजित पवार


पुणे : आपल्या सडेतोड आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ओळखले जातात. आज पुन्हा एकदा त्याचाच प्रत्यय आला. अजित पवार पुण्यातील पोलीस मुख्यालयातील बांधकामाचा आढावा घेताना कामाच्या दर्जावरुन चांगलेच भडकले आणि त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदाराला धारेवर धरले.

अजित पवार यांच्या हस्ते पुणे पोलीस मुख्यालयात विशेष कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा सन्मान करण्यात आला. तसेच कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यानंतर पोलीस मुख्यालयातील कामांचा आढावा घेताना अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. मला चांगले काम बघण्यासाठी बोलवा, असे म्हणत अजित पवार कामाच्या दर्जावर संतापले.

मला अशा कामाच्या पाहणीला गुप्ता बोलावले, तर मी लई बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचे तर हे ‘छा-छू’ काम आहे. पोलिसांचेच काम या ठेकेदाराने असे केले आहे तर बाकीच्यांचे काय? असा प्रश्न विचार अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाही सुनावले.