AIIMS च्या अभ्यासकांनी वर्तवली डेल्टा व्हेरिएंटमुळे लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होण्याची शक्यता


नवी दिल्ली : देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. देशातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशातच एक चिंतेची बाब समोर आली आहे. कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीचे एक किंवा दोन्ही डोस घेतल्यानंतरही डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोनाची लागण होऊ शकते, असे AIIMS च्या एका अभ्यासातून समोर आले आहे.

AIIMS ने हा अभ्यास इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अॅन्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी आणि नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल या संस्थांच्या सहाय्याने केला आहे. ब्रेक थ्रु इन्फेक्शन असलेल्या 63 लोकांचा या अभ्यासामध्ये समावेश करण्यात आला होता. या 63 लोकांपैकी, 36 लोकांना कोरोना लसीचे दोन डोस तर 27 लोकांनी कोरोनाचा एकच डोस घेतला होता. त्यात 51 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश होता.

या 63 लोकांपैकी 10 लोकांना कोव्हॅक्सिनचा तर 53 लोकांना कोव्हिशिल्डचा डोस देण्यात आले होते. कोव्हिशिल्डचे आणि कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेणारे 60 टक्के तर एक डोस घेणारे 77 टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटची लक्षण दिसली आहेत. या दोन्ही लसी या डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहेत, पण त्याचे प्रमाण कमी असल्याचे या अभ्यासात सांगण्यात आले आहे.