अजित पवारांनी सांगितली शरद पवार-प्रशांत किशोर भेटीमागील शक्यता


पुणे – सध्या देशातील राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून आपण संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. २०२४ मध्ये भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न सुरु असताना या भेटीचा संदर्भ त्याच्याशी जोडला जात आहे. दरम्यान या भेटीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी अजित पवार यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीसंबंधी विचारण्यात आले असता त्यांनी सांगितलं की, मी कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले आहे. आता त्यांचे मागील काही अनुभव असतील, वेगळी काही कामे असतील. पण त्यांनी राजकारणाचे क्षेत्र आता सोडले आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचे कारण नाही.

वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकजण “शरद पवारांना वडीलकीच्या नात्याने भेटत असतात. त्यापैकीच ही भेट असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. ही भेट २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आहे का ? असे विचारण्यात आले असता, त्यांनीच आता ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगितल्याचे म्हणत अजित पवारांना विषयाला पूर्णविराम दिला.