मुख्यमंत्री सहायता निधीसाठी महावितरणकडून ५ कोटी १७ लाख, महानिर्मितीकडून १ कोटी २ लाख रुपयांचा निधी


मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी महावितरण आणि महानिर्मितीकडून अनुक्रमे 5 कोटी 17 लाख 34 हजार 631 रुपये आणि 1 कोटी 2 लाख 71 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुपूर्द केला.

सह्याद्री राज्य अतिथीगृहात धनादेश सुपूर्द करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी महावितरण आणि महानिर्मितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल प्रशंसा केली आहे. कोविड-१९ च्या संकटात हे सर्व अधिकारी, कर्मचारी वीज पुरवठा अखंडित राहावा आणि आव्हानात्मक परिस्थितीतही सदैव सज्ज राहिले आहेत. यातूनही त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याची संवेदनशीलता दाखविली आहे, जी कौतुकास्पद आहे.

यात महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या एक दिवसाच्या वेतनातून पाच कोटी १७ लाख ३४ हजार ६५० व महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचाऱी यांच्या एक दिवसाच्या वेतनातून १ कोटी २ लाख ७१ हजार रुपयांचे योगदान एकत्रित करण्यात आले. हे योगदान धनादेशाच्या रुपात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी देण्यात आले आहे.