कोरोनाबाधित बालकांच्या उपचारासाठी केंद्र सरकारने जारी केल्या नव्या गाईडलाइन्स


नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या देशात दिसून येत आहे. एकीकडे दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता ओसरताना दिसत असतानाच दूसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच प्रोढांपेक्षा या तिसऱ्या लाटेच अधिक धोका हा लहान मुलांना असल्याचे सांगितले जात आहे. अशातच केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन त्या दृष्टीकोनातून अनेक गोष्टींची पूर्तता केली जात आहे. अशातच केंद्र सरकारने आता लहान मुलांच्या उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गाईडलाइन्समध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, कोरोनाबाधित मुलांना अँटी व्हायरल रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नये. त्याचबरोबर कोरोनाबाधित मुलांवर उपचार करताना त्यांना स्टेरॉइड देणे टाळा. या गाईडलाइन्समध्ये लहान मुलांची शारीरिक क्षमता तपासण्यासाठी 6 मिनिटांची वॉक टेस्ट घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

लहान मुलांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने असे देखील स्पष्ट केले आहे की, गंभीर रुग्णांना स्टेरॉइड देण्यात यावे. मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या गाईडलाइन्समध्ये, लहान मुलांच्या हाताच्या बोटाला ऑक्सिमीटर लावून त्यांना 6 मिनिटांसाठी फिरण्यास सांगावे. जर यादरम्यान, त्यांचे सॅच्युरेशन 94 हून कमी आले, तर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निष्पन्न होईल. या आधारावर मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुलांना अस्थमा आहे. त्यांच्यासाठी या वॉक टेस्टचा सल्ला देण्यात आलेला नाही, गाईडलाइन्समध्ये उल्लेख करण्यात आल्यानुसार, जर एखाद्या रुग्णास कोरोनाची तीव्र लक्षणे आढळून आली, तर अजिबात उशीर न करता ऑक्सिजन थेरपी सुरु केली जावी.