उच्च न्यायालयाने 20 लाखांचा दंड ठोठवल्यानंतर जुही चावला म्हणते


मुंबई : दिल्ली उच्च न्यायालयात 5G टेक्नॉलॉजीविरोधात बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या याचिकेवरुन तिला फटकारत 20 लाखांचा दंड ठोठावला होता. आता आपल्या सोशल मीडियावर जुहीने एक व्हिडीओ शेअर करत आपले मत मांडले आहे. सोशल मीडियावर जुहीचा हा व्हिडीओ चांगला व्हायरल होत आहे.

व्हिडीओ शेअर करताना जुही चावलाने म्हटले आहे की, नमस्कार, काही दिवसात गोंधळ एवढा वाढला आहे की, मी स्वत:चा आवाजही ऐकू शकले नाही. मला या गोंधळात वाटले की एक अतिशय महत्त्वाचा मेसेज कदाचित विसरलो आणि तो असा होता की आम्ही 5G विरोधात नाही. उलट आम्ही याचे स्वागत करत आहोत. तुम्ही ते नक्की आणा. आम्ही फक्त एवढेच सांगत आहोत की, 5G सुरक्षित आहे हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे.


जुही पुढे म्हणाली की, आमचे केवळ एवढेच म्हणणे आहे की या टेक्नॉलॉजीबाबत तुमचा अभ्यास, संशोधन सार्वजनिक करा, जेणेकरुन आमच्या मनात जी भीती आहे, ती निघून जाईल. आम्ही सगळे निर्धास्तपणे झोपू शकतो. आम्हाला केवळ एवढेच जाणून घ्यायचे आहे की, ही टेक्नॉलॉजी लहान मुले, गर्भवती महिला आणि जन्माला येणाऱ्या बाळांसाठी सुरक्षित आहे.

1 मिनिट 24 सेकंदाचा हा व्हिडीओ जुही चावलाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरही शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना जुहीने कॅप्शनमध्ये ‘Hear’ असे लिहिले आहे. तिच्या या व्हिडीओवर तिचे चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत.