कोरोना प्रभावितांच्या आर्थिक मदतीसाठी अरिजीत सिंह करणार विश्वनाथन आनंदसोबत दोन हात


आपल्या सुरांनी नेहमीच चाहत्यांना भुरळ घालणारा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंह आता लवकरच बुद्धिबळाच्या पटावर सुद्धा दिसून येणार आहे. गायक अरिजीत सिंह विरूद्ध विश्वनाथन आनंद असा सामना येत्या १३ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका ​व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये रंगणार आहे. हा इव्हेंट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे. याची घोषणा या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.


या चॅरिटी मॅचचे आयोजन चेस डॉट कॉम इंडिया, ऑल इंडिया चेस फेडरेशन आणि अक्षय पात्र यांनी एकत्र येऊन केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती या कार्यक्रमाच्या आयोजकांनी दिली आहे. यात त्यांनी लिहिले आहे की, आपल्या आवाजाने ज्याने लाखोंची मने जिंकली आहेत. होय, आम्ही अरिजीत सिंहबद्दलच बोलत आहोत. तो लवकरच एका बुद्धिबळाच्या सामन्यात विश्वनाथन आनंद विरूद्ध खेळताना दिसणार आहे. तर येत्या १३ जून रोजी भेटूया आमच्या यूट्यूब चॅनलवर सायंकाळी ५-८ वाजता. सोबतच या ट्विटमध्ये कोरोनापीडित कुटुंबियांना मदत करण्यासाठी एक लिंक देखील शेअर केलेली आहे.

गायक अरिजीत सिंहने कोरोना काळात गरीब व गरजू लोकांना मदत करण्यासाठी तसेच त्यांना अन्न वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याच्यासोबत अभिनेता आमिर खान, निर्माता साजिद नाडियादवाल हे देखील या सामन्यात खेळताना दिसणार आहेत.

सोशल मीडियावर चेस डॉट कॉमने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, तुम्ही ज्या क्षणांची वाट पाहत आहात, तो क्षण आला आहे. वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदच्या विरोधात अभिनेता आमिर खान चॅरिटी मॅच खेळणार आहे. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी भरभरून मदत करा. येत्या १३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता ही मॅच यूट्यूबवर टेलीकास्ट होणार आहे.