आधुनिक तंत्रज्ञानाची बालगृहातील मुलांच्या पुनर्वसनासाठी मदत उपयुक्त ठरेल – ॲड.यशोमती ठाकूर


मुंबई : शासनाच्या बालगृहात असणाऱ्या मुलांची देखरेख तसेच त्यांची दत्तक विधान प्रक्रिया सुलभपणे होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत उपयुक्त ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. सॉफ्टवेअर आणि ॲप विकसित करण्याबाबत मंत्री ॲड.ठाकूर यांच्यासमोर दोन स्वयंसेवी संस्थांनी सादरीकरण केले.

शासनाच्या बालगृहात असणाऱ्या मुलांचे चांगल्या कुटुंबात पुनर्वसनाच्या दृष्टीने दत्तक विधान प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्याचा प्रयत्न ‘व्हेअर आर इंडियाज चिल्ड्रन’ ही स्वयंसेवी संस्था करत आहे. याबाबत ॲड. ठाकूर यांनी आढावा घेत संस्थेचे प्रयत्न, प्रक्रिया, सॉफ्टवेअरबाबत माहिती घेतली.

मूल दत्तक घेण्यास पालक उत्सुक असतात मात्र त्यांची फसवणूक होऊ नये, अवैधरित्या दत्तक देण्याचे प्रकार होऊ नये यासोबतच दत्तक घेण्याची प्रक्रिया सहज, सुलभ होणे गरजेचे आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो, असे संस्थेच्या चित्रा बुझरुख यांनी सांगितले.

‘आंगण’ या संस्थेने बालगृहातील मुलांच्या देखरेखीसाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अँड्रॉईड ॲप विकसित करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. स्मिता धर्माणे यांनी सांगितले, बालन्याय कायद्यानुसार शासकीय, स्वयंसेवी संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या बालगृहांची निरीक्षण समितीमार्फत वर्षभरात चार वेळा तपासणी केली जाते.

ही संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस करण्यासाठी ॲपचा वापर करता येऊ शकतो. ॲपमुळे ही माहिती तातडीने शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध होईल. मुलांच्या आरोग्याचे तपशील, शैक्षणिक प्रगतीबाबत अद्ययावत माहिती सादर झाल्याने आवश्यक मदत देणे, नवे उपक्रम राबवणे सुलभ होईल. राज्यात सध्या 450 बालगृह असून ॲपमुळे कागदोपत्री होणारी प्रक्रिया जलद होऊ शकेल.

याबाबत बोलताना मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, दत्तक प्रक्रिया सोपी, सुलभ करणे तसेच जी बालके बालगृहात आहेत त्यांच्या सर्वांगीण प्रगतीकडे लक्ष देणे यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणे कौतुकास्पद आहे. अशा डिजिटल प्रयत्नामुळे किचकट काम सोपे आणि पेपरलेस होईल. याबाबत स्वयंसेवी संस्थांना शासन स्तरावरुन आवश्यक सहकार्य करण्यात येईल.