२०० वर्षाचे दशेरी आंब्याचे मूळ झाड आजही देतेय फळे

उन्हाळा अनेक कारणांनी असह्य होत असतो मात्र तो सुसह्य होतो तो आंबा या फळामुळे. भारतात अनेक जातीचे, चवीचे, रंगाचे, स्वादाचे आंबे मुबलक पिकतात. आंबा फळाच्या शेकडो जाती असून प्रत्येक राज्याचा विशेष आंबा आहे. उत्तर प्रदेशची खासियत असलेल्या दशहरी किंवा दशेरी आब्यांच्या एका झाडाला ‘मदर ऑफ मँगो ट्री’ म्हटले जाते. हे झाड २०० वर्षे जुने असून आजही आपल्या फळांनी ते आंबा रसिकांच्या जिव्हेची तृप्ती करते आहे.

दशहरी जातीचा आंबा आता खुपच लोकप्रिय ठरला असून त्याची मोठी निर्यात सुद्धा होते. या जातीचे पहिले झाड लखनौजवळ दशहरी गावात लावले गेले आणि त्यावरूनच या आंब्याला दशहरी नाव पडले. नबाब मोहम्मद अन्सार अली यांनी हे झाड २०० वर्षापूर्वी लावले होते. आजही या झाडाची पहिली फळे त्यांच्या परिवाराला पाठविली जातात. या भागात दशहरीचे सर्वाधिक उत्पादन होते.

असे सांगतात मिर्झा गालिब याना दशहरी आंबा फार आवडत असे. त्यामुळे कोलकाता दिल्ली प्रवासात ते येथे मुद्दाम उतरून आंब्याचा आस्वाद घेत असत. अवध नगरीचा नबाब असफदुल्ला राज्यावर आला तेव्हा त्याने हे झाड कब्जात घेतले होते. या झाडाची फळे सर्वसामान्य लोकांना मिळू नयेत अशी त्याची इच्छा होती असे सांगतात.

आता आंध्रप्रदेश येथेही या आंब्याची लागवड केली गेली आहे. दशहरी पाकिस्तान, नेपाळ, मलेशिया, हॉंगकॉंग, फिलीपिन्स, सिंगापूर, द. कोरिया येथे निर्यात केला जातो.