राज्यात १५ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान वन महोत्सवाचे आयोजन ; सवलतीच्या दरात उपलब्ध होणार रोपे


मुंबई : वृक्ष लागवड व संगोपन हा जनतेचा कार्यक्रम व्हावा तसेच जनतेला वनीकरणाचे महत्त्व पटवून देता यावे या हेतूने राज्यात १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही राज्यात या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून वनविभागातर्फे जनतेला सवलतीच्या दरात रोपे पुरवण्यात येणार आहेत.

राज्यात सुरु असलेला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यापुढेही अखंडपणे चालू राहावा म्हणून या कार्यक्रमांतर्गत खाजगी मालकीचे पडीत क्षेत्र आणि शेताच्या बांधावर, रेल्वे दुतर्फा ,कालवा दुतर्फा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामूहिक पडीत क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. तसेच सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना अल्पदरात रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी वन महोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.

सर्वसाधारण कालावधीत 9 महिन्यांचे रोप (लहान पिशवीतील रोप ) 21 रुपयांना तर 18 महिन्याचे रोप (मोठ्या पिशवीतील रोप) हे 73 रुपयांना एक याप्रमाणे देण्यात येते. परंतु या वनमहोत्सवाच्या काळात 9 महिन्यांचे रोप केवळ 10 रुपयांना तर 18 महिन्यांचे मोठ्या पिशवीतील रोप 40 रुपयांना एक याप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

राज्यात पावसाळ्यात 15 जून ते 30 सप्टेंबर या काळात वृक्ष लागवड करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा व आस्थापना तसेच निमशासकीय यंत्रणा व लोकांचा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेण्यात येणार आहे. ज्या शासकीय यंत्रणांना वृक्ष लागवड करावयाची आहे अशा यंत्रणांना रोपनिर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्यास त्यांना रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येईल.

यासाठी त्यांनी लागणाऱ्या रोपांची आगाऊ मागणी, नजिकचे उपवनसंरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी,सामाजिक वनीकरण विभाग यांचेकडे पत्राद्वारे करावी. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, निसर्गप्रेमी यांनी घेऊन वनेत्तर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.