या कंपनीने लोगोच्या जागी करोना वॉरियर्सचे फोटो छापून दिला अनोखा सन्मान

जंतू, विषाणू पासून आपल्या उत्पादनाने  सुरक्षा देणाऱ्या दिग्गज डेटॉल कंपनीने सोमवारी अनोखे अभियान सुरु केले आहे. ‘डेटॉल सॅल्यूट’ नावाने सुरु केलेल्या या अभियानात कंपनीने त्यांच्या लोगोच्या जागी कोविड वॉरीयर्सचे फोटो आणि त्यांची प्रेरक कहाणी सांगितली आहे. देशभरातील १०० कहाण्या यासाठी तयार केल्या आहेत. त्यात निस्वार्थी भावनेने करोना काळात सर्वसामान्य नागरिकांची मदत करून त्यांचे रक्षण केल्याबद्दल सन्मान म्हणून हे अभियान सुरु केले गेले आहे.

कंपनीने त्यांच्या हात धुण्याच्या लिक्विड हँडवॉश पॅकवर करोना वॉरियर्स फोटो आणि कहाणी प्रदर्शित केली आहे. कंपनीने वेबसाईट www.dettolsalute.com या नावाने देशभरातील नागरिकांसाठी जारी केली आहे. येथे करोना वॉरीयर्सच्या प्रेरक कथा लोक सांगू शकणार आहेत. स्टोरीचा व्हर्च्युअल पॅक बनवून सोशल मीडियावर शेअर करून कोविड रक्षकांची ओळख करून देण्याची सुविधा दिली गेली आहे.

रेकीट, हेल्थ अँड न्युट्रीशनचे दक्षिण आशिया मार्केटिंग डायरेक्टर दिलेन गांधी या संदर्भात म्हणाले, डेटॉल रक्षक वारसा सोबत जे करोना रक्षक या कार्यात मृत्युमुखी पडले त्यांना ही श्रद्धांजली आहे.