केशर अस्सल आहे किंवा नाही, अशी करा खात्री


केशराचा वापर करण्याची परंपरा आपल्याकडे फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. केवळ खाद्यपदार्थांमध्ये नाही, तर औषधी म्हणून, सौंदर्य प्रसाधानांमध्येही केशराचा वापर केला जात असतो. केशराची शेती जम्मू काश्मीर राज्यातील पुलवामा प्रांतामध्ये सर्वाधिक होत असते. केशराच्या फुलांची लागवड साधारण ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांच्या सुमारास केली जाते. त्यानंतर डिसेंबरपर्यंत या झाडांवर फुले येऊन त्यांची तोडणी होत असते. केवळ भारतामध्येच नाही, तर परदेशांमध्येही केशराला मोठी मागणी आहे. तसेच केशर अतिशय महाग असल्याने याची लागवड करणे प्रत्येकाला परवडणारे नाही. आजकाल बाजारामध्ये जे केशर मिळते ते अनकेदा नकली असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. त्यामुळे केशर खरेदी करताना ते अस्सल आहे किंवा नाही याची पारख करता येणे अगत्याचे झाले आहे. केशर अस्सल आहे किंवा नाही हे कसे ओळखावे या संबंधी काही टिप्स, खास ‘माझा पेपर’च्या वाचकांसाठी.

केशराचा केवळ रंगच नाही, तर सुगंधही खास असतो. त्यामुळे अस्सल केशराला विशिष्ट गोडसर सुगंध येतो. या वासावरून केशर ओळखता येते. तसेच खरेदी करण्यापूर्वी केशराची एक काडी तोंडात टाकून दातांनी हलकेच चाववी. अस्सल केशर चवीला काहीसे कडवट लागते. आपण खाऊन पाहिलेली काडी जर कडवट न लागता गोडसर लागली, तर केशर नकली असल्याचे ओळखावे. केशराचा सुगंध गोडसर आणि चव कडवट, ही अस्सल केशराची खूण आहे. केशर अस्सल आहे किंवा नाही हे ओळखण्याची आणखी एक पद्धत म्हणजे, केशराच्या दोन काड्या थोड्या पाण्यामध्ये टाकाव्यात. या काड्यांचा रंग त्वरित पाण्यामध्ये उतरू लागल्यास केशर नकली असल्याचे समजावे. अस्सल केशराचा रंग पाण्यामध्ये त्वरित उतरत नाही. तसेच हे पाणी जितके उकळले जाईल तितका अस्सल केशराचा रंग पाण्यामध्ये हळूहळू उतरतो.

थोड्याश्या पाण्यामध्ये चिमुटभर बेकिंग पावडर मिसळावी आणि त्या पाण्यामध्ये केशराच्या दोन काड्या घालाव्यात. जर या पाण्यामध्ये केशराचा गडद भगवा रंग दिसून येऊ लागला, तर केशर नकली असल्याचे ओळखावे. केशर अस्सल असेल, तर बेकिंग पावडर मिश्रित पाण्यामध्ये त्याचा रंग पिवळा दिसून येईल. अशा रीतीने केशर अस्सल आहे किंवा नाही याची पारख करता येऊ शकेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment