‘अकरा’च्या आकड्यावर संपूर्ण शहराचे असाधारण प्रेम !


आपल्यासाठी एखादा आकडा, किंवा एखादा रंग शुभ आहे, यावर आपल्यापैकी अनेकांना विश्वास असतो. त्यामुळे एखाद्या ठराविक तारखेला एखादे चांगले काम हाती घेणे, किंवा आपला आवडता आकडा आपल्या गाडीच्या नोंदणी क्रमांकामध्ये किंवा नवा मोबाईल नंबर घेताना त्यामध्ये समाविष्ट असेल असे पाहणे, असे आपल्यापैकी अनेकजण करीत असतील. तशी प्रत्येकाच्या आकड्याच्या बाबतीतली पसंती निरनिराळी असली, तरी स्वित्झर्लंड मधील सोलोथर्न शहरामध्ये सर्वच नागरिकांना ‘अकरा’ हा आकडा अतिशय प्रिय आहे. ‘अकरा’च्या आकड्यावरील प्रेम या शहरामध्ये जागोजागी पहावयास मिळते. इतकेच काय, तर सर्वसामान्य घड्याळांमध्ये असलेला बाराचा तास येथील घड्याळामध्ये नाहीच ! येथील सार्वजनिक क्लॉक टॉवरच्या, आणि शहरातील इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी असलेल्या घड्याळांमध्ये केवळ अकराच तास आहेत.

अकरा या आकड्यावरचे नागरिकांचे प्रेम एवढ्यावरच थांबत नाही. या शहरामध्ये असलेल्या चर्चेसची संख्या अकरा असून, यापेक्षा लहान असलेल्या प्रार्थनास्थळांची, म्हणजेच चॅपल्सची संख्याही अकराच आहे. त्याशिवाय अकरा या आकड्याचे अस्तित्व येथील वस्तूसंग्रहालयांमध्ये, ऐतिहासिक इमारतींमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी आवर्जून पहावयास मिळते. या शहरातील सर्वात मोठे सेंट उर्सुस चर्च अकरा वर्षांच्या अवधीमध्ये तयार झाले असून, या चर्चमध्ये असेलेल्या तीन जिन्यांना प्रत्येकी अकरा पायऱ्या आहेत. या चर्चमध्ये असलेल्या घंटांची संख्या अकरा असून, या चर्चला एकूण अकरा दरवाजे आहेत ! या शहराच्या नागरिकांचे अकरा आकड्याचे आकर्षण त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्येही पहावयास मिळते. ही मंडळी आपल्या परिवारातील सदस्याचा अकरावा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करीत असतात. तसेच या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळणाऱ्या भेटींचाही अकरा या आकड्याशी संबंध असतोच.

या शहराचे अकरा या आकड्यावर इतके प्रेम असण्यामागे एक रोचक कथा आहे. एके काळी सोलोथर्नमध्ये राहणारे नागरिक अतिशय मेहनती, कष्टाळू असले, तरी काही ना काही कारणाने त्यांच्या कष्टाला फळ मिळत नसे. त्यामुळे या शहरातील लोकांच्या जीवनामध्ये आनंद नसे. लोक समाधानी नसत. काही काळानंतर या लोकांची मदत करण्यासाठी पर्वतांवरून ‘एल्फ’, म्हणजेच देवदूत अवतरले आणि त्यानंतर या लोकांच्या आयुष्यामध्ये बरकत आली. सगळीकडे सुख समृद्धी दिसू लागली. देवदूतांना ‘एल्फ’ म्हटले जात असून, अकरा या आकड्यालाही जर्मन भाषेमध्ये ‘एल्फ’ म्हटले जाते. समस्त गावाचे दारिद्र्य, दुःख या देवदूतांच्या मदतीने दूर झाल्याची ग्रामस्थांची श्रद्धा असल्याने या शहरातील लोकांच्या आयुष्यांमध्ये अकरा या आकड्याचे अनन्यसाधारण महत्व आहे.

Leave a Comment