सुखी आणि यशस्वी आयुष्यासाठी या सवयी करा आत्मसात


हिंदू धर्मशास्त्र आणि इतर वेदांमध्ये यशस्वी जीवनासाठी आवश्यक अनेक मार्गदर्शक तत्वे समाविष्ट आहेत. या तत्वांचा थेट संबंध आपल्या जीवनातील सर्व चांगल्या वाईट घटनांशी आणि व्यवहाराशी असतो. आपण जीवनात आत्मसात करीत असलेल्या अनेक लहानमोठ्या सवयींच्या परिणामस्वरूप आपल्या जीवनाची दिशा ठरत असते. या सवयी आपल्या यशाचे किंवा अपयशाचे कारण ठरत असतात. त्यामुळे आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असल्यास काही सवयी अंगी बाणविणे अगत्याचे ठरते. ज्योतिष आणि धर्मशास्त्रामध्ये अशा काही सवयींचा उल्लेख केलेला आढळतो. अर्थात या सवयी आत्मसात केल्याने यश मिळणे किंवा न मिळणे हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा भाग आहे.

ज्योतिष शास्त्राच्या अनुसार भोजन झाल्यानंतर ताटामध्ये खरकटे हात धुवू नयेत. तसेच ताटामध्ये अन्न टाकू नये. भोजन झाल्यानंतर खरकटे ताट उचलुन भांडी विसळण्याच्या ठिकाणी नेऊन ठेवावे. तसेच भोजन सर्व परिवाराने एकत्र येऊन घ्यावे. ज्यांच्या अंगी या सवयी नाहीत त्यांना जीवनामध्ये यश सहजी लाभत नसल्याचे ज्योतिषशास्त्र सांगते. अशा व्यक्तींना अपार कष्ट उपसल्यानंतरच थोडे फार यश हाती लागते. अशा व्यक्तींच्या परिवारामध्ये सतत तणावाचे वातावरण राहत असून, पारिवारिक मतभेद जास्त असतात. घरामध्ये आर्थिक तंगी असते. परिवारामध्ये एकजुटीची भावना नाहीशी होते.

अनेकांना घरामध्ये आल्यानंतर आपल्या चपला, बूट कुठेही काढून ठेवण्याची सवय असते. ज्योतिष शास्त्राच्या अनुसार घरामध्ये चपला, किंवा इतर पादत्राणे घालणे अशुभ मानले जात असून, पादत्राणे त्यांच्या विशिष्ट ठिकाणी ठेवली जाण्याला महत्व दिले गेले आहे. घरामध्ये चपला, बूट इतस्ततः पसरले असल्यास त्याचा विपरीत परिणाम ग्रहांवर होत असून, त्यामुळे शत्रू अधिक बलशाली होत असल्याचे ज्योतिष शास्त्र सांगते. घरामध्ये येणाऱ्या अतिथीचे स्वागत नेहमी हसतमुखाने करावे. त्यामुळे यजमानांची प्रतिष्ठा वाढते. तसेच घरामध्ये वास्तूशास्त्राच्या अनुसार झाडे लावल्याने घरामधील नकारात्मक उर्जा नष्ट होऊन सकारात्मक उर्जा राहते. घरामध्ये लावलेल्या झाडांची योग्य निगा घेणेही आवश्यक असून, त्यांना वेळोवेळी पाणी देणे, खते घालणे, सूर्यप्रकाश मिळेल असे पाहणे याही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे जीवनामध्ये बुध, सूर्य आणि चंद्र यांचा प्रभाव चांगला राहत असल्याचे ज्योतिषशास्त्र म्हणते.

घरातील शयनकक्ष नेहमी स्वच्छ, नीटनेटका असावा. ज्यांचा पलंग नेहमी अस्ताव्यस्त पसरलेला असतो, खोलीमध्ये नेहमी पसारा असतो, अशांच्या जीवनावर राहू आणि शनी यांचा दुष्प्रभाव पडत असतो. घराच्या स्वच्छतेच्या सोबत शारीरिक स्वच्छताही अतिशय महत्वाची मानली गेली आहे. त्यामुळे मन प्रसन्न राहून आरोग्यही चांगले राहते.

Leave a Comment