आता जीन्सची पँँट उलटी घालण्याचीही फॅशन !


आजकाल जगभरामध्ये अनेक निरनिराळ्या फॅशन्सच्या लाटा येत असतात. बदलत्या काळानुसार आता फॅशनची परिभाषा देखील बदलली आहे. आल्या दिवसागणिक फॅशन जगतामध्ये नित्य नव्या ट्रेंड्स पहावयास मिळत आहेत. ट्रेंड्स केवळ कपड्यांच्या पुरत्या मर्यादित नसून, अॅक्सेसरीज, आभूषणे, केशभूषा, शूज, बेल्ट्स, इथवर सगळ्याच गोष्टींच्या फॅशन आल्या दिवसागणिक बदलत असतात. जीन्सची पँट आणि जीन्सच्या कपड्यापासून बनविलेले निरनिराळ्या पद्धतींचे पोशाख नेहमीच लोकप्रिय ठरत आले आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये फॅशन आली आहे, ती जीन्सची पँट उलटी घालण्याची !

या नव्या फॅशन बरहुकुम बनविल्या गेलेल्या जीन्सची शिवण बाहेरच्या बाजूला असून, याचे खिसे आतल्या बाजला नसून, जीन्सच्या बाहेर लावलेले असल्याने ही जीन्सची पँट उलट बाजूने घातल्याप्रमाणे दिसते. या जीन्सची छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर आणि अनेक फॅशन पेजेसवर व्हायरल होत असून, ही जीन्स सेनिया आणि अँटोन श्नायडर या फॅशन डिझायनर्सनी ‘सेनिया श्नायडर’ या फॅशन लेबल मार्फत लॉन्च केली आहे.

या जीन्समध्ये दोन प्रकार आणले गेले असून, एक प्रकार ‘स्किनी फिट’, तर दुसरा ‘बेल बॉटम’ या प्रकारात मोडणारा आहे. ही ‘उलटी’ जीन्स सोशल मिडीयावर खूपच लोकप्रिय होत असून या जीन्सला चांगली मागणी होत आहे. एके काळी कपडा उलटा घातला गेला की एखाद्याचे हसे होत असे, आता मात्र अशी ‘उलटी’ जीन्स खरेदी करण्यासाठी लोक हजारो डॉलर्स मोजण्यासही आनंदाने तयार होत आहेत. यावरूनच ‘फॅशन’ची संकल्पना दिवसेंदिवस किती बदलत आहे याची आपण सहज कल्पना करू शकतो.

Leave a Comment