या मंदिरामध्ये केली जाते देवमाशाच्या हाडांची पूजा !


चित्रविचित्र परंपरा असलेल्या मंदिरांची भारतामध्ये कमतरता नाही. यातील प्रत्येक मंदिराची स्वतःची अशी खास परंपरा आहे, आणि ती परंपरा अस्तित्वात येण्यामागे काही खास इतिहास किंवा काही खास आख्यायिकाही या मंदिरांशी निगडित आहेत. अशाच अनेक विशेष मंदिरांपैकी एक मंदिर असे आहे, जिथे देवमाशाच्या हाडांची पूजा केली जाते. गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यामध्ये असलेल्या मगोद डुंगरी गावामध्ये हे मंदिर आहे. या मंदिराला ‘मत्स्य माताजी मंदिर’ या नावाने ओळखले जात असून, या गावातील कोळी समाजाने सुमारे तीनशे वर्षांपूर्वी या मंदिराचे निर्माण करविले होते. मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये होड्या घेऊन जाण्यापूर्वी कोळी या मंदिरामध्ये मत्स्य मातेचे आवर्जून दर्शन घेतात आणि त्या नंतरच मासेमारीसाठी निघतात. मासेमारीसाठी जाण्यापूर्वी या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतले नसल्यास काहीतरी दुर्घटना नक्कीच घडून येते अशी मान्यता येथील कोळी समाजामध्ये रूढ आहे.

या मंदिराच्या निर्मितीमागे कथा अशी, की तीनशे वर्षांपूर्वी या गावामध्ये राहत असलेल्या प्रभू तांडेल नामक कोळ्याला एक दृष्टांत झाला. त्यामध्ये गावाच्या समुद्र किनाऱ्यावर एक विशालकाय देवमासा आल्याचे त्याला दिसले. समुद्र किनाऱ्यावर येताच या देवमाशाच्या रूपाने देवी आल्याचे प्रभूला दिसले खरे, पण किनाऱ्यावर येताच या देवीरूपी देवमाशाने प्राण त्यागल्याचेही प्रभू तांडेलाला स्वप्नात दिसले. जेव्हा प्रभूला झोपेतून जाग आली, तेव्हा आपल्या या स्वप्नाचा विचार करीतच तो समुद्र किनाऱ्यावर पोहोचला. तिथे पोहोचताच त्याच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. त्याला स्वप्नात दृष्टांत झाल्याप्रमाणे खरोखरच एक विशालकाय देवमासा किनाऱ्यावर मृतावस्थेत पडलेला त्याला दिसला. इतका मोठा मासा या पूर्वी कधीच पाहिला नसल्याने ग्रामस्थ मंडळी देखील आश्चर्यचकित झाली होती. तिथे एकत्र झालेल्या ग्रामस्थांना प्रभू तांडेलाने आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले. त्याचे म्हणणे ऐकून देवमाशाच्या रूपाने देवी गावामध्ये आल्याचे ग्रामस्थांनी मान्य केले आणि त्याच ठिकाणी ‘मत्स्य मातेचे मंदिर’ उभे राहिले.

या मंदिराच्या निर्मितीपूर्वी समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या देवमाशाचे अवशेष प्रभू तांडेलाने जमिनीमध्ये पुरले होते. मंदिराच्या निर्मितीचे काय पूर्ण झाल्यावर देवामाश्याच्या झाडांचा सांगाडा जमिनीतून बाहेर काढून मंदिरामध्ये ठेवण्यात आला. गावातील काही मंडळींनी प्रभू तांडेलाच्या स्वप्नाची खिल्ली उडवीत मत्स्य मातेच्या मंदिराच्या निर्मितीला विरोध केला असता, त्याचे दुष्परिणाम, एका भयंकर आजाराच्या साथीच्या रूपाने ग्रामस्थांना भोगावे लागले असल्याची आख्यायिकाही या गावामध्ये रूढ आहे. जेव्हा प्रभू तांडेल आणि इतर कोळ्यांनी देवीची क्षमा मागितली, तेव्हा ही आजाराची साथ आपोपाप निवळली असे म्हटले जाते. तेव्हापासून गावामध्ये मत्स्य मातेची पूजा अर्चा मोठ्या आस्थेने केली जाते.

Leave a Comment